Home ताज्या बातम्या मागेल त्याला शेततळ्यांचे व ड्रीपचे प्रलंबित असलेले सर्व प्रस्ताव तात्काळ निकाली काढा-...

मागेल त्याला शेततळ्यांचे व ड्रीपचे प्रलंबित असलेले सर्व प्रस्ताव तात्काळ निकाली काढा- कृषी मंत्री धनंजय मुंडे

0

राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पहिल्यांदाच कृषी खातं आलेलं आहे. आज त्यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी पहिलीच आढावा बैठक घेतली.बैठकीनंतर बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, कृषी मंत्रीपदाची माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे. स्वाभाविकच शेतीचं आणि माझं आगळंवेगळे नातं आहे. मी पहिल्यांदा कृषी मंत्री झाल्यानंतर खूप खूश आहे, त्या अनुषंगाने आज आढावा बैठक घेतली.

मुंडे पुढे म्हणाले की, आज शेतकरी संकटात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी आहे.

 

आजच्या आढावा बैठकीत चर्चा झालेले निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येणार आहेत. सुरुवातीला ‘लॉटरी सिस्टीम’नुसार शेततळे आणि सिंचन दिले जात होते. मात्र आता मागेल त्याला शेततळे ही योजना असेल असा महत्त्वाचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

 

”पर्जन्यमान लांबलंय, तसं या पुढच्या काळात लांबायला नको. किती ठिकाणी दुबार पेरणीची आवश्यकता आहे, या अनुषंगानेही चर्चा करण्यात आलेली आहे. एक रुपयांमध्ये विमा योजना दिली जात आहे. विमा योजनेचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा, असं आवाहन आहे.

 

शेतकऱ्यांना हमीभाव मिळायलाच हवा आणि जर हमीभावापेक्षा जास्त रेट जर मिळत असेल तर कुणालाही नाराज व्हायचं कारण नाही.”

कृषी विभागाची मागेल त्याला शेततळे व मागेल त्याला ड्रीप ( ठिबक सिंचन) , शेड नेट अशी योजना आहे. मात्र त्यामध्ये अर्ज करणाऱ्यांची संख्या लाखांवर असून विभागामार्फत दहा-दहा हजार शेतकऱ्यांची लॉटरी काढली जाते. लॉटरी काढायची असेल तर मग त्याला मागेल त्याला शेततळे, असे कसे म्हणता येईल, असे लक्षात आणून देत धनंजय मुंडे यांनी विभागाकडे शेततळ्यांचे व ड्रीपचे प्रलंबित असलेले सर्व प्रस्ताव तात्काळ निकाली काढावे असे निर्देश विभागाला दिले आहेत.

 

सध्या राज्यभरात व विशेष करून मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अद्याप कमी आहे शेतकऱ्यांवर बहुतांश ठिकाणी दुबार पेरणीचे ही संकट येऊ शकते त्यामुळे राज्य सरकारच्या महत्वकांक्षी एक रुपयात पिक विमा या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सहभागी होऊन तातडीने आपला पिक विमा भरणे गरजेचे आहे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.

 

पिक विमा भरताना कोणत्याही ग्राहक सेवा केंद्राच्या चालकांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्यास त्यावरही तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

 

राज्यात मागील काही दिवसात बोगस बियाण्यांच्या साठ्यांवर कारवाई करण्यात आली होती राज्यात कुठेही बोगस बियाण्यांची विक्री होत असेल अशा रॅकेटवर धडक कारवाया करून कुठेही शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याकडेही विभागाचे सर्वाधिक लक्ष असेल असेही धनंजय मुंडे यांनी आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

शेतकऱ्यांना पेरणीसाठी मदत करण्यापासून ते त्यांच्या पिकाला भाव मिळवण्यापर्यंत सर्व जबाबदारी ही कृषी विभागाची असून आपण अत्यंत प्रामाणिकपणे या विभागात चांगले काम करून दाखवू व कृषी विभागालाही प्रतिष्ठा मिळवून दाखवू असेही मत त्यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

विभागात असलेल्या सर्व रिक्त पदांचाही अहवाल लवकर सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले आहेत.

 

आजच्या बैठकीस कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, सहसचिव श्रीमती सरिता देशमुख-बांदेकर, उपसचिव संतोष कराड, फलोत्पादनचे संचालक कैलास मोते, विस्तार व प्रशिक्षण संचालक दिलीप झेंडे, निविष्ठा व गुण नियंत्रण संचालक विकास पाटील, मृद संधारण व पाणलोट विकासाचे संचालक रवी भोसले, आत्माचे संचालक दशरथ मंगाळे, कृषी प्रक्रिया व नियोजनाचे संचालक सुभाष नागरे आदी उपस्थित होते.

 

माझे वडील स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे हे शेतकरी होते त्यांनी ऊस तोडणीचेही काम केलेले आहे त्यांना शेतीची खूप आवड होती आज ऐन वाढदिवसाच्या दिवशी मला कृषी खाते मिळाले याचा मला मनस्वी आनंद असून याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांचे आभार व्यक्त करतो असेही धनंजय मुंडे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

 

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version