पाटोदा |
पाटोदा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात सध्या मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. असे असतानाही केवळ पाटोदा नगरपंचायतीच्या बेजबाबदार आणि गलथान कारभारामुळे शहराला चक्क १५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. या नियोजित पाणीटंचाईमुळे नागरिकांची मोठी अडवणूक होत असून, सामाजिक कार्यकर्त्या निलाताई पोकळे यांनी प्रशासनावर घणाघाती आरोप करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शहराच्या मुख्य जलस्त्रोतात पाणी असतानाही पाटोदेकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. १५ दिवसांच्या अंतराने येणाऱ्या पाण्यामुळे गृहिणींचे नियोजन कोलमडले असून महिला, वृद्ध आणि लहान मुलांना पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नगरपंचायतीच्या या कारभारामुळे नागरिकांना नाइलाजास्तव खाजगी टँकरवर हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत.
निलाताई पोकळे म्हणाल्या की, “हे केवळ प्रशासकीय अपयश नसून नागरिकांवर लादलेली जबरदस्ती आहे. तलावात पाणी असूनही नागरिकांना तहानलेले ठेवणे हा अन्याय आहे. नगरपंचायतीने आपला बेजबाबदार कारभार थांबवून तात्काळ नियमित पाणीपुरवठा सुरू करावा.”
नगरपंचायतीने या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास, संतप्त नागरिकांसह नगरपंचायतीसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोकळे यांनी दिला आहे. यामुळे आता नगरपंचायत प्रशासन काय पावले उचलते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
विशेष बाब म्हणजे पाटोदा शहरात कोट्यवधी रुपयांच्या अनेक पाणी पुरवठा योजना राबविण्यात आलेल्या असूनही पाटोदेकरांना पाणी वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांत लोकप्रतिनिधीबद्दल मूक संताप व्यक्त केला जात आहे.
