बीड |
घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन योजनेच्या अंतिम बिलावर सही करून ते मंजुरीसाठी वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच मागणारा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा उपकार्यकारी अभियंता आणि वरिष्ठ सहायकाला बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई दि. २५ जून रोजी जिल्हा परिषदेच्या परिसरात केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या पिंपळवंडी (ता. पाटोदा) येथील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन योजनेंतर्गत भूमिगत नालीचे काम पूर्ण झाले होते. या कामाचे अंतिम बिल मंजुरीसाठी पाठवायचे होते. यासाठी उपकार्यकारी अभियंता मुकुंद चंद्रसेन आंधळे (वय ३३, रा. सारडानगरी, बीड) आणि त्याचा कार्यालयातील वरिष्ठ सहायक किरणकुमार महादेवराव हिवाळे (४५, रा. शिंदेनगर, बीड) यांनी तक्रारदाराकडे ८५ हजारांच्या लाचेची मागणी केली होती.
यापैकी ३५ हजार नवीन कामासाठी, तर ५० हजार जुन्या कामासाठी मागण्यात आले होते. ‘एसीबी’ने तक्रारीची पडताळणी केली असता, आंधळे आणि हिवाळे यांनी ८० हजार रुपये लाचेची मागणी करून ती रक्कम किरण हिवाळे याच्यामार्फत स्वीकारण्याचे मान्य केले. पथकाने बुधवारी सापळा रचून हिवाळे याला तक्रारदाराकडून ८० हजारांची लाच स्वीकारताच पकडले. त्यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.