मुंबई |
राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै या कालावधीत पार पडणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या चहापानाला विरोधक जाणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
विरोधकांकडून नेहमीच या चहापानावर बहिष्कार टाकला जातो. दरम्यान, या अधिवेशनात काही महत्त्वाचे आणि वादग्रस्त विषय गाजण्याची शक्यता आहे. त्यात हिंदी भाषेची सक्ती, शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा विरोधक उपस्थित करतील. यामुळे सरकारची डोकेदुखी वाढू शकते.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यात त्रिभाषा धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. पहिल्यापासूनच विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकवण्यात येणार होत्या. यात हिंदी भाषेची सक्ती करण्यावरून वाद निर्माण झालाय. राज्यातील विरोधी पक्षांसह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सरकारच्या निर्णयाला जोरदार विरोध केलाय. या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची भेटही घेतलीय.
सरकारने सुरुवातीला हिंदी विषय सक्तीचा केला होता. मात्र नंतर टीकेच्या लाटेमुळे ही सक्ती मागे घेण्यात आली. त्यानंतर सरकारने पूरक भाषा म्हणून हिंदी शिकवण्याचा पर्यायी प्रस्ताव मांडला. तरीही शिक्षकांची अपुरी संख्या, संसाधनांचा अभाव आणि स्थानिक भाषांचा अपमान केल्याचे आरोप करत विरोधक पुन्हा आक्रमक झाले. या पार्श्वभूमीवर अधिवेशनात हिंदी विषयावरून सरकारला घेरण्याची विरोधकांची तयारी असणार आहे.
शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दाही विरोधकांच्या हातात असणार आहे. सरकारने अलीकडेच शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंजुरी दिली. कोल्हापूर, धाराशिव, बीड आणि इतर जिल्ह्यांतून हा प्रकल्प जाणार आहे. या महामार्गासाठी अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांकडून याला तीव्र विरोध करत आहेत. या प्रकल्पावरून सरकार आणि विरोधक यांच्यात सभागृहात चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधक भूसंपादनाची प्रक्रिया थांबवण्याची मागणी करत सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील.
राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरूनही विरोधक नाराज आहेत. अनेक ठिकाणी लाभार्थ्यांना वेळेत मदत मिळत नसल्याची तक्रार आहे. यावर प्रहारचे बच्चू कडू यांनीही आंदोलन केलं. आता या मुद्द्यामुळे वातावरण तापलं आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.