Home क्राईम उसने दिलेले पैसे मागितल्यानेच डोक्यात दगड घालून खून ; दगडवाडी हत्या प्रकरणाचा...

उसने दिलेले पैसे मागितल्यानेच डोक्यात दगड घालून खून ; दगडवाडी हत्या प्रकरणाचा छडा लागला 

0

बीड स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपीला बेड्या

 

बीड |

पाटोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दगडवाडी शिवारात १ फेब्रुवारी रोजी घडलेल्या चांद अल्हाहुद्दीन तांबोळी (वय ३०, रा. रायमोहा) यांच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात बीड स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. उसने दिलेले पैसे वारंवार परत मागितल्याच्या रागातून आरोपी अतिक गुलाब तांबोळी (रा. इस्लामपुरा पेठ, बीड) याने चांद यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

 

दिनांक १ फेब्रुवारीच्या रात्री ८ ते २ फेब्रुवारीच्या सकाळी ८ वाजेच्या दरम्यान बीड ते शिरूर रोडवरील दगडवाडी गावच्या शिवारात एका ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता. मृताची ओळख चांद तांबोळी (रा. रायमोहा, व्यवसाय पेंटिंग) अशी पटली होती. अज्ञात आरोपीने त्यांच्या डोक्यात दगड मारून निर्घृण हत्या केली होती. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ अन्वये खुनाचा गुन्हा (गु.र.नं. ३०/२०२६) दाखल करण्यात आला होता.

असे सापडले तपासाचे धागेदोरे

अज्ञात आरोपीचे कोणतेही सुगावा नसताना हे प्रकरण पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बंटेवाड यांनी विशेष पथक नेमले होते. या पथकाने गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता, अतिक गुलाब तांबोळी याच्यावर संशय बळावला.

पोलिसी खाक्या दाखवताच दिली कबुली

मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने बीड येथील शासकीय रुग्णालय परिसरातून अतिक तांबोळी याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चांद तांबोळी यांच्याकडून त्याने हात उसने पैसे घेतले होते. चांद यांनी या पैशांचा तगादा लावल्यामुळे रागाच्या भरात अतिक याने त्यांचा काटा काढल्याचे सांगितले.

 

ही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि सुशांत सुतळे, श्रीराम खटावकर, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, बाळू सानप, राहुल शिंदे, मारुती कांबळे, युनूस बागवान, पोअ यादव, सुरवसे, अशफाक, परझणे, शेख आणि चालक हराळे यांच्या पथकाने केली. आरोपीला पुढील तपासासाठी पाटोदा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version