Home क्राईम तरुणाची दगडानं ठेचून निर्घृण हत्या

तरुणाची दगडानं ठेचून निर्घृण हत्या

0

बीड |

शिरूर- कासार तालुक्यातील खोकरमोह शिवारात एका 30 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना सोमवारी (2 फेब्रुवारी) उघडकीस आली. या भीषण हत्याकांडामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ही हत्या नेमकी कोणी आणि का केली? याचे गूढ अद्याप कायम आहे.

 

मिळालेली माहिती अशी, की बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील खोकरमोह शिवारात रायमोह येथील कलरचे काम करणारा चांद उर्फ (गुड्डू) अलाउद्दीन तांबोळी (वय- 30 वर्षे) या तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली असून खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी शिरूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण जाधव व रायमोह पोलिस चौकीचे रवी उबाळे व अन्य कर्मचारी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

रक्ताने माखलेल्या मृतदेहामुळे खळबळ
सकाळी परिसरातून जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास हा रक्ताने माखलेला मृतदेह आला. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. माहिती मिळताच शिरूर कासार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला. घटनेची भीषणता पाहता तपासाला गती देण्यासाठी फॉरेन्सिक लॅबच्या टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. या पथकाने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने आणि इतर पुरावे गोळा केले आहेत.

 

आरोपींना लवकरात लवकर अटक करून कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. सध्या पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला असून, अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस प्रशासन करत असून लवकरच आरोपी जेरबंद होतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला जात आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version