महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका मंगळवारी जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद बोलावली असून दुपारी साडेतीन वाजल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागणार आहे.
महाराष्ट्रासह झारखंड विधानसभेसाठीही निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत.
संपूर्ण देशाकडे निवडणुकीकडे लक्ष
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष फुटल्यानंतर विधानसभेची पहिली निवडणूक होत आहे. यामुळं राज्याच्या राजकारणासाठी ही निवडणूक महत्त्वाची असेल. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चा सुरु आहेत. 2019 साली महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक एका टप्प्यात पार पडली होती. यावेळी किती टप्प्यात राज्याची निवडणूक होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं महत्त्वाची ठरणा आहे.
महाराष्ट्र विधानसभेची मुदत कधीपर्यंत?
महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. पण यंदा हरियाणा विधानसभेची निवडणुकांची घोषणा आधी झाली.
कोणत्या राज्यात किती जागा?
महाराष्ट्र विधानसभेत 288 सदस्य आहेत. महाराष्ट्रात सध्या महायुतीचे सरकार आहे. झारखंड विधानसभेत 81 सदस्य आहेत. या राज्यात 2019 मध्ये निवडणुका झाल्या होत्या. हरियाणामध्ये 90 जागा आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द करण्यात आले. जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे राज्य विभागले गेले आहे. याआधी 2014 मध्ये येथे शेवटची निवडणूक झाली होती.