Home देश मे महिन्यातही अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार

मे महिन्यातही अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार

0

राज्यात सध्या ऊन-वारा-पावसाचा खेळ सुरु आहे. कुठे उष्णतेची लाट तर कुठे अवकाळी पावसाचा कहर आहे. अशातच भारतीय हवामान विभागानं अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील काही जिल्ह्यात एप्रिल महिन्यात अवकाळी पावसानं तडाखा दिला होता. आता मे महिन्यात देखील अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे. विदर्भासह मराठवाडा आणि मध्यमहाराष्ट्र वगळता कोकण, गोवा आणि मुंबईसह उपनगरांमध्येही पाऊस पडणार आहे.

मुंबई आणि उपनगरांत सोमवारी सायंकाळी ढगाळ वातावरण राहिल. तसेच सोसाट्याचा वाराही सुटला होता. मंगळवारीपासून 5 मेपर्यंत ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाट होईल, अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

विदर्भासह मराठवाड्यात तापमानात घट..

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात देखील अवकाळी पाऊस राहिल. विदर्भ आणि मराठवाडा आणि आजुबाजूच्या जिल्ह्यात पुढील चार दिवस तापमानात घट जाणवेल. तसेच काही भागाला अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंदाजानुसार, एप्रिल महिन्यात देखील राज्याच्या एकूण कमाल तापमानात 2 ते 4 अंशांनी घट नोंदवण्यात आली होती. तर, काही भागांना मात्र अवकाळीनं पुन्हा एकदा झोडपून काढलं.

दरम्यान, एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. पपई, मूग, हळद, टोमॅटो पिकांसह फळबागांना गारपीटीचा मोठा फटका बसला आहे.

मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता

एप्रिल पाहता पाहता आता मे महिन्यात देखील वरुण राजाची अवकृपा होणार आहे. अवकाळी पावसाचा अंदाज आहे. या पावसाचा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता असल्याची भीती हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे बळीराजा आतापासून चिंतातूर झाला आहे.

कोणत्या राज्यांना ऑरेंज अलर्ट?

महाराष्ट्रासह राजस्थान आणि उत्तराखंड राज्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या राज्यांसाठी पुढील आठवडाचा अवकाळी पावसाचा असणार आहे. मात्र, 8 मे नंतर परिस्थिती पूर्णपणे बदलेल, असा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे.

त्याचबरोबर पाकिस्तानचा उत्तर भाग आणि त्यालगत असणाऱ्या राजस्थानच्या पश्चिम भागात निर्माण झालेल्या चक्रीवादळ सदृश परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग आणि छत्तीसगढच्या दक्षिण भागाला पावसाचा तडाखा बसू शकतो. पुढील 24 तासांत लक्षद्वीप, तामिळनाडू, रायलसीमा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या भागांत देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. दुसरीकडे, काश्मीर आणि स्पितीच्या खोऱ्यात थंडी वाढून काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

चारधाम यात्रेवर थेट परीणाम

उत्तराखंडमध्ये पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंड राज्यात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून पर्वतीय भागांमध्ये हिमवृष्टीचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान बदलाचा थेट परिणाम चारधाम यात्रेवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटनावर परिणाम होऊ शकतो.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version