पुणे |
दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना युनिक डिसॲबिलिटी आयडेंटिफिकेशन कार्ड’ (यूडीआयडी) काढणे केंद्र सरकारने एक एप्रिलपासून बंधनकारक केले आहे. राज्यात हे कार्ड अनिवार्य करण्यात आले नव्हते. परंतु आता केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील दिव्यांगांना हे ‘कार्ड’ काढणे बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
बोगस प्रमाणपत्र घेऊन योजनालांचा लाभ घेण्याचे प्रमाण देखील वाढते आहे. या पार्श्वभूमीवर दिव्यांगांना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी केंद्र सरकारने ‘यूडीआय’ कार्ड अनिवार्य केले आहे. राज्यात ‘यूडीआय’ कार्ड व दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळण्यासाठी सध्या १३ लाख ७८ हजार ५१७ अर्ज आले आहेत. आतापर्यंत ८ लाख ९५ हजार दिव्यांगांना ‘यूडीआय’ प्रमाणपत्र देण्यात आले असून, सव्वादोन लाखांहून अधिक दिव्यांगांचे अर्ज प्रलंबित आहेत. तर दोन लाख ४८ हजार ४७२ अर्ज नाकारण्यात आले आहेत. येथून पुढे हे कार्ड अनिवार्य होणार असल्यामुळे दिव्यांगांना ते वेळेत कसे मिळेल, यांचे नियोजन दिव्यांग कल्याण आयुक्तांकडून कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याचे दिव्यांग कल्याण आयुक्ताकडून सांगण्यात आले.
हे लक्षात ठेवा
- केंद्र सरकारच्या www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा.
- अर्ज भरताना त्यामध्ये आधार क्रमांकाचाही उल्लेख करावा.
- दिव्यांगत्वाचा प्रकार निवडण्याची सुविधा. बहुदिव्यांगत्व असल्यास तसेच नमूद करावे.
- अर्जामध्ये निवासस्थाना जवळचे एक रुग्णालय निवडावे.
- निवड केलेल्या रुग्णालयातून अर्जदाराला वेळ कळविली जाईल.
- त्या तारखेला त्या रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी होईल.
- त्यानंतर ‘युडीआय’ कार्ड व प्रमाणपत्र मिळेल.
‘यूडीआयडी’ कार्डामुळे चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्ती यांची अचूक माहिती शासन स्तरावर जमा होणार आहे. त्यानंतर केंद्र व राज्य सरकारतर्फे दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यास पात्र ठरणार आहेत. त्यामुळे सर्व दिव्यांग व्यक्तींनी ‘यूडीआयडी’ संकेतस्थळावर नोंदणी करून आपले कार्ड काढून घ्यावे. दिव्यांग व्यक्तींच्या ओळख पडताळणीसाठी ‘यूडीआयडी’ कार्ड हा एकमेव दस्तावेज ठरणार असून, दिव्यांगत्व सिद्ध करण्यासाठी विविध कागदपत्रे बाळगण्याची गरज भासणार नाही.
– संजय कदम, उपायुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्तालय
येथे होते वैद्यकीय तपासणी
‘यूडीआयडी’ संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर पुणे जिल्ह्यात ससून रुग्णालय, औंध जिल्हा शासकीय रुग्णालय, कमला नेहरू रुग्णालय, बारामती मेडिकल कॉलेज, पिंपरी येथील वायसीएम, मंचर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी अर्जदार दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी होते. त्या आधारे दिव्यांगत्वाच्या टक्केवारीचा उल्लेख असलेले कार्ड व प्रमाणपत्र मिळते.