बीड |
बीड तालुक्यातील साक्षाळपिंपरी येथे सिंदफना नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी स्वतः पहाटेच्या सुमारास नदीपात्रात उतरून ही धडक कारवाई केली. यामध्ये दोन ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली असून, वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
सोमवारी (दि. १२) पहाटे पारगाव सिरस महसूल मंडळाच्या हद्दीत साक्षाळपिंपरी येथील सिंदफना नदीपात्रातून विनापरवाना वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली होती. त्यानुसार तहसीलदार शेळके यांनी पथकासह सापळा रचला.
- पहिली कारवाई: पथकाने अफसर शेख याचे ट्रॅक्टर अडवले असता, त्यात सुमारे एक ब्रास अवैध वाळू आढळली. कागदपत्रांची मागणी केली असता चालक कोणतीही रॉयल्टी पावती दाखवू शकला नाही. कारवाई सुरू असतानाच आरोपी अफसर शेख याने महसूल कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून ट्रॅक्टर पळवून नेले. याप्रकरणी आता पंचनामा करून कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
- दुसरी कारवाई: त्यानंतर लगेचच सुनील बेदरे यांच्या मालकीचे दुसरे ट्रॅक्टर अवैध वाळू नेताना पकडण्यात आले. महसूल पथकाने हे ट्रॅक्टर आणि ट्रॉली ताब्यात घेतली असून, संबंधितांवर दंडात्मक कारवाई प्रस्तावित आहे.
प्रशासनाचा ‘झिरो टॉलरन्स’ इशारा
विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर आणि जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात ‘शून्य सहनशीलता’ (Zero Tolerance) धोरण राबवण्याचे आदेश दिले आहेत. अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक आणि निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
”बीड तालुक्यात कुठेही अवैध वाळू उपसा किंवा वाहतूक खपवून घेतली जाणार नाही. चोरट्या वाहतुकीवर यापुढेही अशाच कडक कारवाया सुरू राहतील.”
— चंद्रकांत शेळके, तहसीलदार, बीड.
उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या सूचनेनुसार झालेल्या या कारवाईत तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्यासह मंडळ अधिकारी स्मिता गुंजाळ, ग्राम महसूल अधिकारी यशवंत सानप, दादासाहेब शेळके आणि महसूल सहायक भरत भंडाणे यांनी सहभाग घेतला.
प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.


