आष्टी | प्रतिनिधी
आष्टी विधानसभा मतदार संघाचे माजी आ.भीमराव धोंडे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवल्याने त्यांना भाजपातून निलंबित करण्यात आले आहे.त्यानंतर ते कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर माजी आ. भीमराव धोंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या गटात जाणार असल्याची विधानसभा मतदार संघात जोरदार चर्चा सुरु आहे.
दरम्यान अजित पवार बीड जिल्ह्यात आपले पक्षाची ताकत वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. बीड विधानसभेचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचेही अजित पवारांशी जवळीक वाढलेले आहे. भीमराव धोंडे आणि संदीप क्षीरसागर राष्ट्रवादीकडे गेल्यास बीड आणि आष्टी मतदार संघात राष्ट्रवादीचे ताकद मोठ्या प्रमाणात वाढू शकते.
चार वेळा माजी आ.भीमराव धोंडे यांनी आष्टी विधानसभा मतदार संघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केलेले व्यक्तिमत्व आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी ते आग्रही होते परंतु आ.सुरेश धस यांना भाजपाने उमेदवारी दिल्यानंतर माजी आ.भीमराव धोंडे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.त्यांनी अपक्ष निवडणूक लढविल्याने त्यांना भाजपने निलंबीत केलेले आहे. विधानसभा निवडणुकीत बंडखोरीनंतर भाजपने निलंबित केलेले माजी आ. भीमराव धोंडे यांनी भाजपला पूरक काम सुरू केले होते; परंतु त्यांचे सध्याचे राजकीय समीकरण पूर्णपणे बिघडले आहे.विद्यमान आ. सुरेश धस यांच्यासोबत त्यांचे जुळत नाही.एका म्यानात दोन तलवारी कशा राहणार ? यामुळे पक्ष नेतृत्वापुढे पेच आहे. आजी-माजी आमदारांच्या या बिघाडीमुळे भीमराव धोंडे यांच्या समर्थकांनाही बळ मिळत नसल्याची तक्रार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने,विधान सभेप्रमाणे अपक्ष राहून कार्यकर्त्यांचे खच्चीकरण नको म्हणून भीमराव धोंडे यांनी आता ठोस निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे.ते भाजप सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
सध्या धोंडे हे मुंबईतच वारीष्ठांच्या गाठीभेटी घेत आहेत.या सर्व घडामोडींवर आता मतदार संघात एकच प्रश्न विचारला जात आहे, ‘व्हय खरंच धोंडेसाहेब भाजप सोडणार का? आणि गेलेच तर भाजपची आष्टीतील गणित बिघडणार का ? या सर्व चर्चेमुळे भीमराव धोंडे यांच्या मनात चाललंय काय ? अशी चर्चा आष्टी,पाटोदा,शिरुर का. विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.