मुंबई |
राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी पुन्हा नव्याने पक्ष बांधणीस सुरुवात केली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी आपले नवीन शिलेदार मैदानात उतरवले आहेत. मात्र, अजित पवारांसोबत गेलेल्या 5 मोठ्या नेत्यांच्याविरोधात जाळ विणलं असल्याची चर्चा आहे. या 5 नेत्यांच्या पराभवासाठी शरद पवारांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाचे चिन्ह आणि अधिकृत नाव हे अजित पवार गटाकडे गेले. पक्षातील फुटीनंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्ष बांधणीस सुरुवात केली. या दरम्यान त्यांनी पु्न्हा आपल्या जुन्हा सहकाऱ्यांना साद घातली. भाजप आणि इतर पक्षात गेलेले शरद पवार यांचे सहकारी पुन्हा त्यांच्याकडे आले. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी प्रतिष्ठेची झालेली बारामती लोकसभा निवडणूक जिंकून दाखवली. सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवारांविरोधात जवळपास सगळ्यात मतदारसंघातून आघाडी मिळाली. तर, या पराभवाने अजित पवार यांच्या करिष्म्यावर प्रश्न निर्माण झाले. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विजयाची सरासरी सर्वाधिक होती.
शरद पवारांच्या रडारवर कोणते नेते?
अजित पवार
आपल्याच पुतण्याविरोधात शरद पवार आक्रमक असल्याचे दिसून येत आहे. अजितदादांना लोकसभेत धोबीपछाड दिल्यानंतर आता शरद पवारांनी विधानसभेतही त्यांना मात देण्याची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत बारामती विधानसभा क्षेत्रातून सुप्रिया सुळे यांना 48 हजार मतांची आघाडी होती. अजित पवारांसाठी हा मोठा धक्का होता. त्यानंतर, आता अजितदादांविरोधात शरद पवारांनी त्यांचा पुतण्या युगेंद्र पवाराला मैदानात उतरवले आहे. या माध्यमातून आता राज्यात आणखी एक काका-पुतण्याची जोडी आमनेसामने आली आहे.
दिलीप वळसे पाटील
आंबेगाव मतदारसंघाचे गेली अनेक वर्ष प्रतिनिधीत्व करणारे आणि शरद पवारांचे निकटवर्तीय दिलीप वळसे पाटील यांनीदेखील अजितदादांना बंडात साथ दिल्याने शरद पवारांना धक्का बसला. त्यामुळे शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटलांच्या पराभवासाठी चांगलाच जोर लावला आहे. या मतदारसंघातून शरद पवार यांनी देवदत्त निकम यांना उमेदवारी दिली आहे. आंबेगावमधील प्रचारसभेत बोलताना शरद पवारांनी वळसे पाटलांना गद्दार संबोधले. या आक्रमक भाषेवरून पवार यांची वळसे पाटलांविरोधातील भूमिका स्पष्ट झाली आहे.
छगन भुजबळ
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याशी फारकत घेत छगन भुजबळ यांनी शिवसेनेत बंड केले आणि शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेसमध्ये सहभागी झाले. त्यानंतर भुजबळ यांनी कायमच पवारांना साथ दिली. मात्र, अजितदादासोबत गेल्याने आणि जवळच्या व्यक्तीने धोका दिल्याने दुखावलेल्या पवारांनी येवल्यातही भुजबळांच्या विरोधात चक्रव्यूह रचला आहे. येवलामध्ये शरद पवारांनी माणिकराव शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.
हसन मुश्रीफ
पश्चिम महाराष्ट्रावर शरद पवारांचे वर्चस्व असल्याचे म्हटले जाते. कोल्हापूर आणि सातारा या दोन जिल्ह्यांवर शरद पवारांचे बारीक लक्ष असते. या कोल्हापूरमध्ये शरद पवारांचे विश्वासू हसन मुश्रीफ यांनी देखील अजित पवारांना साथ दिली. कागलमध्ये वर्चस्व असणारे आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून तयारी सुरू केली होती. शरद पवारांनी भाजपमध्ये असणारे समरजित घाटगे यांच्या हाती तुतारी देत मुश्रीफांसमोर आव्हान निर्माण केले आहे. समरजीत घाटगे यांना उमेदवारी देण्यासह पडद्या मागूनही शरद पवार सुत्रे हलवत आहेत. त्यामुळे या मतदारसंघाकडे राज्याचे विशेष लक्ष लागले आहे.
धनंजय मुंडे
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद, मंत्री केल्यानंतरही अजित पवारांना साथ देणे ही बाब शरद पवारांना रुचली नाही. धनंजय मुंडे यांनी केलेला दगाफटका हा शरद पवारांना रुचला नाही. शरद पवारांना बीड जिल्हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांना धक्का देण्यासाठी शरद पवार हे उत्सुक आहे. बीडमध्ये मराठा मते कोणाकडे फिरणार, यावर विजयाचे समीकरण ठरणार आहे. परळीत धनंजय मुंडे यांच्याविरोधात शरद पवारांनी राजेसाहेब देशमुख यांना उदवारी दिली आहे. मूळचे काँग्रेसचे असलेल्या देशमुखांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.