20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

जवाबदारीनेच तंत्रज्ञानाचा वापर करा; सायबर क्राईम विशेषज्ञ संदीप गादीया यांचे आवाहन

- Advertisement -

सायबर क्राईम आणि सुरक्षिततेचा मुलमंत्र कार्यशाळा संपन्न 

बीड । प्रतिनिधी
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ज्यामुळे प्रगती झाली ते ज्ञान म्हणजे विज्ञान. ज्या ज्ञानामुळे सर्वांचे आयुष्य सुखकर झाले ते ज्ञान म्हणजे विज्ञान. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाची प्रगती होत असतांना याचे फायदे आणि तोटे याकडं लक्ष देणे ही काळाची गरज बनली आहे. तंत्रज्ञानाच्या आगमनाने जीवन खूप सोपे झाले असले तरी प्रत्येकाने काळजी आणि जवाबदारीने तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. नसता त्याकडे दुर्लक्ष केल्यास नुकसानीला सामोरे जावं लागेल, असे मुंबई येथील प्रसिद्ध सायबर विशेषज्ञ संदीप गादीया यांनी येथे म्हटले.
चातुर्मास निमित्त बीडच्या जैन भवनमध्ये गुरु आनंद दिवाकर दरबारमध्ये प्रज्ञामुर्ती साध्वी डॉ. अक्षयज्योतिजी म. सा. यांच्या आशिर्वचनाने रविवारी (दि.6) सकाळी 9.30 वाजता सायबर क्राईम आणि सुरक्षिततेचा मुलमंत्र या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना संदीप गादीया बोलत होते.
यावेळी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. अजित राख, राजस्थानी सेवा समाजाचे सचिव रामेश्वर कासट यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेच्या प्रारंभी नितीनचंद्र कोटेचा, विजकुमार खिवंसरा, कांतीलाल ओस्तवाल यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविकात रामलाल छाजेड यांनी कार्यशाळा आयोजनाची माहिती थोडक्यात विषद केली.
गादीया म्हणाले की, विज्ञान ही ज्ञानाची सुसंबद्ध, क्रमबद्ध व वैशिष्टपूर्ण शाखा आहे. विज्ञानाने मनुष्य जीवनासाठी उपयुक्त प्रत्येक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जसे मोबाईल, लॅपटॉप, टॅबचा वापर विविध अ‍ॅप आणि सोशल माध्यमांच्या विविध वापरासाठी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, रात्री झोपल्यापासून सकाळी उठेपर्यंत आपण अशा वस्तूंचा उपयोग करतो, ज्या सुविधांचा उपभोग घेतो ती सर्व विज्ञानाचीच देणगी आहे. मात्र आजच्या तंत्रज्ञानाच्या या युगात त्याच्या फायद्याबरोबर तोटे देखील तितकेच आहेत. मोबाईलवर येणार्‍या विविध लिंकस् व मॅसेज हे काळजीपूर्वक तपासले पाहिजेत कारण यातून फसवणूकीचे प्रकार हल्ली वाढले आहेत. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता व त्या लिंकला व मॅसेजला क्लिक करणे धोकादायक बनले आहे. यातून फसवणूकीचा धोका सर्वाधिक वाढला असून लॉटरीचे तिकीट खरेदी न करता ऑनलाईन लॉटरी जिंकल्याचा मॅसेज येणे किंवा कोणत्याही कागदपत्रांची पुर्तता न करता तुम्हाला विविध अ‍ॅपद्वारे लोनच्या सुविधा तसेच बँकेतून केवायसी अपडेट किंवा ओटीपीसाठी लिंक व माहिती विचारणे अशा फसवेगिरीला बळी न पडता कोणालाही आपली वैयक्तीक माहिती देऊ नका. कारण बँक तुम्हाला वैयक्तीक माहिती कधीच विचारत नाही. मात्र याचा सारासार विचार न करता आपली फसगत होते आणि यातूनच सायबर क्राईमचे गुन्हे अधिक वाढू लागले आहेत. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकासात बेजबाबदार लोकांकडून सहज छेडछाड होऊ लागली आहे. विज्ञानाला त्याच्या अत्याचारी वापरासाठी दोषी ठरवले जाऊ शकत नाही. विज्ञानाच्या दुरुपयोगासाठी मनुष्य जबाबदार आहे. आपण विज्ञानाचा योग्य वापर करतो की त्याचा गैरवापर करतो हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करतांना योग्य पद्धतीनेच केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आभार रतीलाल भंडारी यांनी मानले.
या कार्यशाळेस सर्वच क्षेत्रातील मान्यवरांसह शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री वर्धमान जैन स्थानकवासी श्रावक संघ, श्री जैन दिवाकर शिक्षण प्रसारक मंडळ व चातुर्मास समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.
फसवणूक झाल्यास सायबर सेलची मदत घ्या
वीज बिल भरणे, तिकीट बुक करणे, यासह अनेक महत्वाची कामं करण्यासाठी इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. पण, इंटरनेटच्या अतिवापरामुळे बँकिंग फसवणूक, ऑनलाईन फसवणूक, आणि इतर अनेक सायबर गुन्ह्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे गेल्या काही काळात पाहायला मिळाले आहे. अशात, नागरिकांच्या मदतींसाठी सरकारने एक सायबर क्राईम पोर्टल सुरू केले आहे. प्रत्येक पोलिस अधीक्षक कार्यालयात साबर सेलचे कार्यालय आहे. त्याठिकाणी सायबर क्राईम विरोधातील गुन्ह्यांची नोंद करु शकतो. त्यामुळे अशी फसवणूक झाल्यास न घाबरता त्या विरोधात तक्रार करणे आवश्यक असल्याचे ही सायबर क्राईम विशेषज्ञ संदीप गादीया यांनी म्हटले.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles