- Advertisement -
तब्बल १५ गुन्ह्यांत हवा असलेला ‘महाठग’ गजाआड; केज पोलिसांनी कराडमधून ठोकल्या बेड्या
बीड |
वैद्यकीय शिक्षणासाठी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला केज उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. सौरभ सुहास कुलकर्णी (रा. नागपूर) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाब या राज्यांमध्ये एकूण १५ फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
धारूर येथील फिर्यादी डॉ. अविनाश रामचंद्र तोंडे (वय २७) हे बारामती येथे कार्यरत असताना त्यांची ओळख फेसबुकवर ‘एस. के. इज्युकेशन’ नावाच्या अकाउंटवरून आरोपी सौरभ कुलकर्णीशी झाली. फिर्यादीला एम.डी. मेडिसिनसाठी प्रवेश हवा होता. आरोपीने वर्धा येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये ६५ लाख रुपयांत प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले. प्रवेशाच्या बहाण्याने २० ते २९ सप्टेंबर २०२४ दरम्यान आरोपीने डॉ. तोंडे यांच्याकडून नगदी आणि फोन-पे द्वारे एकूण ८ लाख रुपये उकळले. मात्र, कोणत्याही यादीत नाव न आल्याने आणि पैसे परत मागितल्यावर आरोपीने धमकी दिल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तीन राज्यांत पसरलेले जाळे: ३.८६ कोटींची फसवणूक
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांनी या प्रकरणाचा तपास स्वतःकडे घेतला. तपासादरम्यान आरोपीचा गुन्हेगारी इतिहास समोर आला असून, त्याने आतापर्यंत नाशिक, सोलापूर, जालना, नागपूर, पुणे, मुंबई, सांगली आणि बीड (धारूर) तसेच इतर राज्यत अमृतसर (पंजाब) आणि बनासकांठा (गुजरात).
अशा एकूण १५ गुन्ह्यांमध्ये त्याने तब्बल ३ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपी अत्यंत चालाख असल्याने तो सतत ठिकाणे बदलत होता. बीड सायबर सेल आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने त्याचे लोकेशन सातारा जिल्ह्यातील कराड येथे असल्याचे समजले. सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली केज येथील पथकाने सापळा रचून १३ जानेवारी २०२६ रोजी त्याला ताब्यात घेतले.
बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम , पोउपनि जावेद कराडकर, पोउपनि अमीर इनामदार, आणि पोलीस नाईक मंदे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
आरोपीने अशाच प्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


