Home आरोग्य व शिक्षण वैद्यकीय प्रवेश: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा कट-ऑफ घसरला

वैद्यकीय प्रवेश: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा कट-ऑफ घसरला

0

राज्य कोट्यातील प्रवेशाच्या पहिल्या निवड यादीत सरकारी तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या एमबीबीएस प्रवेशासाठीच्या कट-ऑफ गुणांमध्ये मोठी घट झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा गेल्या वर्षीच्या नीट गुणांचा 642 गुणांवरून यंदा 509 गुणांवर कट-ऑफ आला असून तब्बल 133 गुणांची घट झाली आहे.खासगी महाविद्यालयांत तो 602 वरून 479 गुणांवर घसरला आहे, म्हणजे 123 गुणांची घट झाली आहे.

 

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या वैद्यकीय समुपदेशन समितीने केंद्रीय कोट्यातील प्रवेश प्रक्रियेची निवड यादी जाहीर केल्यानंतर आता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून राज्य कोट्यातील वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाची पहिली निवड यादी जाहीर केली. या यादीमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 8 हजार 138 जागांपैकी 8 हजार 106 जागांवर तसेच दंत अभ्यासक्रमाच्या 2 हजार 718 जागांपैकी 2 हजार 709 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

या विद्यार्थ्यांना 22 ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. दरम्यान, 15 ऑगस्ट रोजी असलेल्या स्वांतत्रदिन व 16 ऑगस्ट रोजी असलेल्या गोकुळाष्टमीच्या दिवशी प्रवेश बंद राहणार आहे. वैद्यकीय समुपदेशन समितीने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र 1 सप्टेंबर 2025 पासून सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या पहिल्या यादीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांनी केंद्रीय कोट्यांतर्गत प्रवेशासाठी अर्ज केलेला असतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्या कोट्यातून चांगले महाविद्यालय उपलब्ध झाल्यास ते त्या कोट्यातून प्रवेश घेतात. तसेच पहिल्या निवड यादीतील अनेक विद्यार्थी ‘अधिक चांगले महाविद्यालय’ हा पर्याय निवडतात. त्यामुळे दरवर्षी पहिल्या यादीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी साधारणपणे 50 ते 60 टक्केच विद्यार्थी पहिल्या फेरीमध्ये प्रवेश घेतात. त्यामुळे या फेरीमध्ये शिल्लक राहिलेल्या जागा या दुसर्‍या फेरीसाठी उपलब्ध केल्या जातात.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version