Home ताज्या बातम्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात किमान ८० टक्के मतदान होईल-जिल्हाधिकारी

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात किमान ८० टक्के मतदान होईल-जिल्हाधिकारी

0

लोकसभेत मतांचा टक्का ७० च्या पुढे गेला होता. आता विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात किमान ८० टक्के मतदान होईल. यासाठी जिल्हा प्रशासन तयारी करतच आहे; मात्र सर्वच घटकांनी जनजागृतीत पुढे येऊन काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश पाठक यांनी केले.

 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. १६) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, प्रभारी अपर जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्रकुमार कांबळे, बीडच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कविता जाधव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शैलेश सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.

 

शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यात गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज व परळी असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या सहाही मतदारसंघांत एकूण २१ लाख ९७ हजार ८३० मतदार आहेत. त्यामध्ये १५ लाख ५८ हजार ९९८ पुरुष, १० लाख ३८ हजार ८०९ महिला मतदार आहेत. तृतीयपंथी मतदार २३ आहेत. या मतदारांमध्ये दिव्यांग मतदार नऊ हजार २७२ आहेत.

 

ज्यामध्ये पाच हजार ९८४ पुरुष, तीन हजार २८८ महिला मतदार आहेत. वय वर्षे ८५ हून अधिक मतदार ३८ हजार १४० आहेत, ज्यामध्ये १५ हजार ५२० पुरुष, २२ हजार ६२० महिला आहेत. यासह संवेदनशील मतदान केंद्रे, बॅलेट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट, पोलिस पथके, निमलष्करी पथके, स्थिर पथके आदींची माहितीही पाठक यांनी दिली. आवश्यक त्याप्रमाणात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

‘त्या’ ९६ केंद्रांवर लक्ष

 

लोकसभेत ज्या मतदान केंद्रांवर ९० टक्के मतदान झाले आणि एकाच उमेदवाराला ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले, अशी जिल्ह्यात ९६ केंद्रे आहेत. अशा केंद्रांवर प्रशासनाचे लक्ष असणार आहे. निम्म्यावर पोलिंग बूथवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे अविनाश पाठक यांनी सांगितले. निमलष्करी दलासह आवश्‍यक पोलिस बंदोबस्तही मागविण्यात आला आहे. लोकांना ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम बाळगता येणार आहे. गस्ती पथके, फिरते पथकेही कार्यरत राहतील.

 

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम

 

अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक ता. २२ ऑक्टोबर

 

उमेदवारी अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक ता. २९ ऑक्टोबर

 

अर्जांची छाननी ता. ३० ऑक्टोबर

 

अर्ज मागे घेण्याचा दिनांक ता. चार नोव्हेंबर

 

मतदान ता. २० नोव्हेंबर

 

मतमोजणी व निकाल ता. २३ नोव्हेंबर

 

निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक ता. २५ नोव्हेंबर

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version