Home ताज्या बातम्या लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधुचा भयंकर खुलासा;आई-वडिलांच्या दबावामुळेच आपण लग्नासाठी होकार दिला

लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधुचा भयंकर खुलासा;आई-वडिलांच्या दबावामुळेच आपण लग्नासाठी होकार दिला

0

पुणे |

पुण्यात घडलेल्या एका प्रकरणाने विवाह, संमती आणि जबरदस्तीने लादल्या जाणाऱ्या नात्यांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. लग्नाच्या अवघ्या तिसऱ्या दिवशी पत्नीने पतीला स्पष्ट शब्दांत नकार दिला आणि आपल्याला हे लग्न मान्य नसल्याचे सांगितले. आई-वडिलांच्या दबावामुळेच आपण लग्नासाठी होकार दिला, असे तिने पतीला सांगितल्यावर त्याला मोठा धक्का बसला. त्यानंतर केवळ 20 दिवसांतच पत्नी माहेरी निघून गेली आणि पुन्हा सासरी परतलीच नाही.

 

ही घटना जून 2024 मध्ये झालेल्या 27 वर्षीय पती आणि 24 वर्षीय पत्नीच्या विवाहाशी संबंधित आहे. लग्नानंतर पतीने सहजीवनाची अपेक्षा व्यक्त केली, मात्र पत्नीने संबंध प्रस्थापित करण्यास नकार दिला. तिने सुरुवातीलाच या नात्यात राहण्याची मानसिक तयारी नसल्याचे स्पष्ट केले होते. काही दिवसांतच पत्नी घर सोडून गेल्यानंतर पतीने अनेकदा संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद मिळाला नाही.

 

अखेर मे 2025 मध्ये पतीने कौटुंबिक न्यायालयात धाव घेत लग्न रद्द करण्याची मागणी केली. न्यायालयाने हे प्रकरण वेगाने हाताळत केवळ 7 महिने आणि 16 दिवसांत निकाल दिला. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी.डी. कदम यांनी पत्नीची साक्ष, परिस्थिती आणि विवाहासाठी दिलेली संमती स्वेच्छेची नव्हती, हे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत विवाह रद्द करण्याचा निर्णय दिला.

 

हा निकाल केवळ एका दांपत्यापुरता मर्यादित नाही. लग्न ही केवळ सामाजिक औपचारिकता नसून दोन्ही बाजूंची स्पष्ट, मुक्त आणि सततची संमती आवश्यक आहे, हे या प्रकरणातून अधोरेखित होते. पुण्यातच यापूर्वी डिसेंबरमध्ये प्रेमविवाह केलेल्या एका जोडप्याने अवघ्या 24 तासांत कायदेशीररीत्या विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. दोन ते तीन वर्षांच्या ओळखीनंतर लग्न करूनही वैचारिक मतभेदांमुळे त्यांनी वेगळे होणे स्वीकारले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version