झिसान सिद्दिकी यांच्या कार्यालयातून बाहेर पडत असताना अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि.१२) रात्री सव्वानऊच्या सुमारास निर्मलनगर परिसरात घडली.त्याच्या मृत्यू झाल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे पूर्व येथील झिसान सिद्दिकी यांच्या कार्यालयाजवळ त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात आले होते. यातील एक गोळी त्यांच्या छातीला लागली होती. त्यानंतर त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. १५ दिवसांपूर्वी त्यांना जीवे धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी दोन संशयितांना अटक
सिद्दीकी हे कार्यालयातून बाहेर पडत असताना तीन हल्लेखोर घटनास्थळी दबा धरून बसले होते. त्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यावेळी त्यांचा सहकारी त्यांच्या सोबत होता. गोळीबारादरम्यान सहकाऱ्यालाच्या पायालाही एक गोळी लागली. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयिताना अटक केली असून हा गोळीबार पूर्वनियोजित प्लॅन असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून परिसरातील सीसीटिव्हीच्या आधारे पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.गृहमंत्री देवेंद्र फडणवीस रुग्णालयात दाखल झाले आहेत. याबरोबरच अभिनेता संजय दत्तही रुग्णालयात दाखल झाला आहे. त्यांच्या जवळच्या नातेवाईकांसह कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली आहे.