राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात लवकरच मी दौरा करणार आहे. आपल्याला आपला डाव खेळायचा आहे, अशी घोषणा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली. त्याचवेळी अब चलूँ मैं अपनी चाल पर…असे सांगायला देखील त्या विसरल्या नाहीत. आमच्या लोकांना, वंचितांना त्रास दिला तर तुमची खैर नाही, काली बनकर लौटी हूँ, असेही पंकजा म्हणाल्या. महाराष्ट्राच्या समाजमनांत धुसमत असलेल्या मराठा-ओबीसी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा रोख मनोज जरांगे पाटील यांच्याकडे होता, असे बोलले जाते.
सालाबादाप्रमाणे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान भक्तिगडावर संपन्न झाला. या मेळाव्याला प्रथमच त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती. त्याचबरोबर माजी खासदार सुजय विखे पाटील, ओबीसी आरक्षणासाठी लढणारे लक्ष्मण हाके, वाल्मिक कराड आदी नेत्यांची उपस्थिती होती.
पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ्या बापाने तुमची जबाबदारी माझ्या पदरात टाकली आहे. ऊसतोड कामगारांचे मला वाईट वाटते. ऊसतोड मजुरांचे जीवन बदलल्याशिवाय मी शेवटचा श्वास घेणार नाही. मी सांगितल्याशिवाय ऊस तोडायला जायचं नाही. मतदान करायला थांबा, आपल्याला आपला डाव खेळायचा आहे. यावेळी झालेली गडबड पुसून टाकायची आहे. त्यासाठी लवकरच मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
पंकजा मुंडे कुणालाही घाबरत नाही. तसेच कुणालाही अंधारात जावून भेटत नाही. मंत्री असताना जिल्ह्याचा विकास दिला. पदावर असताना कधीही भेदभाव केला नाही. आपल्याला जातीभेद करणारा समाज घडवायचा नाही. जात बघून काम करणारी गोपीनाथ मुंडेंची अवलाद नाही. भगवान बाबांनी फक्त चारित्र्य जपले. इथे चूक चालणारच नाही, असे पंकजा म्हणाल्या.
माझा पराभव झाल्यावर पाच लेकरांनी जीव दिला. निवडून आल्यानंतर जेवढी इज्जत मिळाली नाही, त्यापेक्षा अधिक इज्जत पराभूत झाल्यानंतर मिळाली. जो वंचित पीडित आहे, त्याच्या न्यायासाठी मी राजकारणात आली आहे. माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मी राजकारणात नाही. पराभूत झाल्यामुळे मी थकली वगैरे नाही. पुन्हा नव्याने जोमाने तुम्हीही कामाला लागा. जाताजाता एवंढच सांगते की, अब जो भी होगा मैं देखूँगी, जो लिखा काल के भाल पर… काँटे हो या हो अंगारे.. अब चलूँ मैं अपनी चाल पर… एक बहन थी माता थी, काली बनकर लौटी हूँ, मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ….!”
असा दिवस उजाडू देऊ नका
लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघात जातीय संघर्षाचा फटका बसला. त्यांचा थोड्या मतांनी पराभव झाला. बीड जिल्ह्यासह टोकदार होत चाललेल्या जातीय संघर्षावर पंकजा मुंडेंनी सावरगावातील भगवान गडावर झालेल्या दसरा मेळाव्यात भाष्य केले. हा असा समाज घडवण्यासाठी आम्ही आमच्या आयुष्यातील २२ वर्षे खपवली नाही’, असे म्हणत आमदार Pankaja Munde यांनी खंत व्यक्त केली. पंकजा मुंडे खोटं बोलते का? पंकजा मुंडे थापा मारते का? पंकजा मुंडे अंधारात एक, उजेडात एक वागते का? कुणाला घाबरते का? अंधारात कुणाला जाऊन भेटते का? मी कुणाला घाबरत नाही. घाबरते ते या समोरच्या मैदानात माझं भाषण ऐकायला लोक नसतील, त्या दिवसाला घाबरते. मी भगवान बाबांना प्रार्थना करेन की, असा दिवस सुद्धा उजाडू देऊ नका. असे म्हणत पंकजा मुंडेंनी मनातील भीती बोलून दाखवली.
पंकजा मुंडे पुन्हा जाणार महाराष्ट्र दौऱ्यावर
आजच्या मेळाव्याला 18 पगड जातीचे लोक आले की नाही, नाशिकहून आले का, नगरहून आले का, बुलढाण्याहून आले का, आता कुठून कुठून आले गंगाखेड, जिंतूर परभणी नांदेड, अकोलाअमरावती, राज्यभरातून बांधव आलेले आहेत. तुम्हाला मी दरवर्षा साष्टांग दंडवत घालते. कारण माझ्या बापाने मरताना माझ्या झोळीत तुमची जबाबदारी टाकली आहे. तुम्ही मला जिंकवलं मला इज्जत दिली. माझा पराभव झाल्यावर सर्वात अधिक इज्जत दिली. आता मी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात दौऱ्याला येणार आहे. आपल्याला आपला डाव खेळायचा की नाही.मी तुमच्याकडे येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात सगळीकडे येणार आहे. चांगल्या दिवसाची लोक वाट पाहत आहेत. त्यासाठी मी येत आहे. आता तयारी करा. कोयते घासून ठेवा. पाऊस पडला आहे. दिवाळी केल्याशिवाय ऊसतोडीला जाऊ नका. मी हरल्यामुळे नाराज होऊ नका, असं आवाहनही यावेळी पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
पंकजांनी व्यासपीठावर बोलावलं अन् सांगितलं हा माझा मुलगा
आमदार पंकजा मुंडे यांनी जमलेल्यांना संबोधित करताना त्यांच्या मुलाला समोर बोलावलं आणि त्याची ओळख यावेळी करून दिली आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, हा माझा मुलगा आर्यामान हा भगवान बाबाच्या दर्शनाला आलाय. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या मुलाला पुढे बोलून आर्यमान याची ओळख करून दिली. यावेळी उपस्थितांनी एकच जल्लोष केला.
हा माझ्यापेक्षा फार उंच पण छोटासा आहे, आज भगवान बाबाच्या दर्शनाला आला आहे, तो मला फार प्रिय आहे, असं वाटतं असेल ना तुम्हाला, हे माझं लेकरू आहे म्हणून ते प्रिय आहे, असं वाटतं असेल ना पण, मी त्याला सांगितलं आहे, तुझ्यापेक्षा जास्त मला हे लोक प्रिय आहेत. कारण माझ्यावर जीएसटीचा छापा पडला तर, या बह्हादरांनी माझ्यासाठी बारा कोटी जमा केले. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा माझ्या लेकरांनी जीव दिला. मी माझ्या लेकरांपेक्षा जास्त तुमच्यावर जीव लावते, आणि तुम्ही माझ्यावर, मला बास इतकंच पाहिजे, बाकी काही नको.