Home महाराष्ट्र कांदा खरेदीवरून धनंजय मुंडे विधानसभेत आक्रमक, 17 गोण्या विकून 1 रुपया मिळालेल्या...

कांदा खरेदीवरून धनंजय मुंडे विधानसभेत आक्रमक, 17 गोण्या विकून 1 रुपया मिळालेल्या आष्टीच्या शेतकऱ्याची पावती विधानसभेत दाखवली!

0

नाफेडच्या कांदा खरेदीची आकडेवारी सहित केली पोलखोल!

“छोटे मन से कोई बडा नहीं होता”, अटलजींच्या कवितेतून मुंडेंचे सत्ताधाऱ्यांना चिमटे

भगवानगड, गहिनीनाथ गड, नारायण गड या तीनही गडांच्या विकासकामांना प्रत्येकी 25 कोटी निधीची मुंडेंची मागणी

मुंबई |

राज्यभरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, शेतकरी संकटात सापडला त्यावेळी झोपलेले सरकार कांद्याचा प्रश्न पेटल्यांनातर आता नाफेड ने खरेदी सुरू केल्याचा बनाव करत आहे. रब्बी हंगामातील रांगडा कांदा खरेदी करण्याची सुरुवात नाफेड ने दोनच दिवसांपूर्वी केले असल्याचे स्वतःहून जाहीर केले. तसेच केवळ काही शेकड्यात कांदा नाफेडने खरेदी केला, शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून सरकार बनाव करत आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. धनंजय मुंडे यांनी विधानसभेत बोलताना केला.

पणन विभागाच्या पुरवणी मागण्यांच्या निमित्ताने धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील कांदा खरेदीची आकडेवारी पुराव्यानिशी सभागृहात मांडली. नाफेडच्या अधिकृत ट्विट हँडल वरून देखील कांदा खरेदीची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून, तोही पुरावा मुंडेंनी सादर केला. बीड जिल्ह्यातील कडा येथील शेतकरी नामदेव लटपटे या शेतकऱ्याने दोन दिवसांपूर्वी 17 गोण्या कांदा विकल्यांनातर त्याला 1 रुपया मिळाला होता, ती पावतीच धनंजय मुंडे यांनी विधानसभेत दाखवली. सरकारने कांदा प्रश्नी निर्यात धोरण निश्चित करून तसेच भावांतर योजना राबवुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी मुंडेंनी यावेळी केली.

अटलजींची कविता आणि मुंडेंचे चिमटे

दरम्यान राज्यात सत्तांतर झाल्यापासून सगळं आलबेल आहे, असं दाखवण्यात येत असेल तरी प्रत्यक्षात मात्र तसे नाही, हे पुरवणी मागण्यांवरून दिसून येत आहे, अशी मिश्किल टिप्पणी मुंडेंनी केली.

सुमारे साडेसहा हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांचा अभ्यास केल्यास कळते की भाजपचे मंत्री असलेल्या विभागांना तब्बल 87% निधी देण्यात आलाय, तर मुख्यमंत्री यांच्या सहित शिंदे गटांचे आमदार मंत्री असलेल्या विभागांना केवळ 13% निधी देण्यात आलाय. यावरून कोणाच्या मनात काय सुरू असेल याचा अंदाज येतोच, असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला.

यावेळी सत्ताधारी पक्षातील नेत्यांना उद्देशून धनंजय मुंडे यांनी अटलजींची “छोटे मन से कोई बडा नहीं होता और टूटे मन से कोई खडा नहीं होता”, या ओळी म्हणत चांगलेच चिमटे काढले.

ग्रामविकास विभाग 

ग्रामविकास विभागाच्या चर्चेत धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात श्री क्षेत्र भगवानगड, श्री क्षेत्र गहिनीनाथ गड व श्री क्षेत्र नगद नारायणगड या तीनही तीर्थ स्थळी मंजूर करण्यात आलेल्या तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यातुन प्रत्येकी 25 कोटी रुपये निधी मंजूर करण्याची मागणी केली.

बीड जिल्ह्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर असलेल्या 518 किलोमीटर रस्त्याची कामे रखडली असून आवश्यकतेनुसार त्या कामांची निविदा प्रक्रिया पुन्हा राबवून ती कामे पूर्ण केली जावीत, असेही नमूद केले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सध्या विरोधी बाकांवर असलेल्या सदस्यांच्या मतदारसंघात मंजूर केलेल्या ग्रामीण विकासाच्या अनेक कामांचा निधी सरकारने अडवला आहे, राजकारण बाजूला ठेवून एकात्मिक विकासासाठी त्या स्थगित्या रद्द करून सरकारने तो निधी उपलब्ध करून द्यावा, असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले.

याव्यतिरिक्त धनंजय मुंडे यांनी काही विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी ऐन परीक्षेच्या काळात काम बंद आंदोलन केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले, तसेच त्यांना मानसिक त्रास झाला याची दखल शासनाने घ्यावी व याबाबत मध्यस्ती करावी अशीही सूचना मुंडेंनि केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version