महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएसी) परीक्षेतून वन अधिकारी झालेल्या दर्शना दत्तू पवार (वय-26) हिचा निघृण खून केलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांना राजगड किल्ल्याच्या परिसरात मिळून आला होता. याप्रकरणी तिचा मित्र राहूल हंडोरे (२८, रा. शाह, ता. सिन्नर, नाशिक) याला पोलिसांनी अटक केली असून त्याने दर्शना पवारचा खून माझ्याकडून अनावधनाने झाल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. सुरुवातीला कटरने वार करुन त्यानंतर डोक्यात दगड घालून तिचा खून करण्यात आल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.
दर्शना पवार ही एमपीएसीतून वन अधिकारी झाल्यावर तिच्या कुटुंबींयांनी तिचे लग्न दुसरीकडे ठरवले होते. याचा राग लहानपणापासून तिच्या ओळखीचा व एमपीएससी परीक्षेची तयारी सोबत करणाऱ्या राहूल याला आला होता. दर्शना हिला परीक्षेसाठी सर्व प्रकारची मदत राहूल करत होता आणि मागील तीन ते चार वर्ष त्यांनी एकत्रितरित्या पुण्यात परीक्षेची तयारी केली होती. मात्र, संबंधित परीक्षेत राहुल याची थोडक्यात संधी हुकली तर दर्शना उत्तीर्ण झाली होती. त्यानंतर तिने आपल्यासोबत बोलण्यास व राहण्यास टाळाटाळ सुरूवात केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे.
आधी कटरने वार नंतर घातला दगड
12 जून रोजी दर्शना व राहुल हे एकत्रितरित्या दुचाकीवर राजगड किल्यावर फिरावयास गेले होते. त्यावेळी दर्शना आणि राहूल किल्ल्यावरून फिरून एकाठिकाणी थांबले होते. सदर जागी लग्नाचे कारणावरुन त्यांच्यात जोरदार वाद झाल्यावर राहुल याने कटर ब्लेडने तिच्या शरीरावर तीन ते चार वार केले. यामध्ये एक कटरचा वार तिच्या गळयाला लागून त्यातून मोठा रक्तस्त्राव सुरू झाला. सदर रक्तस्त्राव थांबत नसल्याने राहुल घाबरला आणि त्याने जवळच पडलेला दगड उचलून तिच्या डोक्यात घालून तिचा निघृण खून केला. त्यानंतर घटनास्थळावर तिला सोडून त्याने पळ काढला.