-11.3 C
New York
Saturday, January 31, 2026

Buy now

spot_img

कर्ज फेडण्यासाठी सोनार कारागीर बनला दरोडेखोर; बीड पोलिसांनी आवळल्या मुसक्या

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

​३० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; कर्जबाजारी सोनार कारागिरानेच रचला होता कटाचा डाव

बीड |

माजलगाव येथील सराफ दुकानदार श्री. अमोल पंढरीनाथ गायके यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून १८ तोळे सोने आणि १ किलो चांदी असा एकूण ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे, या गुन्ह्याचा मास्टरमाइंड हा एक कर्जबाजारी सोनार कारागीर असल्याचे निष्पन्न झाले आहे.

​दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी, माजलगाव येथील अमोल सोन्याच्या दुकानाचे मालक अमोल गायके हे त्यांच्या पुतण्यासह दुचाकीवरून खेर्डा येथील आठवडी बाजारात दागिने विक्रीसाठी जात होते. यावेळी भाट वडगाव परिसरात दोन दुचाकीवरून आलेल्या पाच इसमांनी त्यांना अडवून सत्तूरचा धाक दाखवला आणि दागिन्यांची पिशवी जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण केले. आरोपींनी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी दुचाकी आणि चालक यांची आपसात अदलाबदल केली होती, मात्र पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून ते सुटू शकले नाहीत.

​बीड शहरातील शांताई हॉटेलच्या पाठीमागील गल्लीत आरोपी असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून एकनाथ ऊर्फ नारायण अरुण कपाले (वय ३५), कृष्णा तुकाराम निरडे (वय २२) आणि अभिषेक अशोक शिंदे (वय २२) यांना ताब्यात घेतले. तपासात संजीव ऊर्फ संजय विष्णूदास कांबळे (वय २८) यालाही अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी अद्याप फरार आहे.

कर्जबाजारी कारागिराचा ‘प्लॅन’

​मुख्य आरोपी एकनाथ कपाले हा सोनार कारागीर असून त्याने पूर्वी माजलगावमध्ये काम केले होते. कोणत्या दिवशी सराफ व्यापारी बाजारपेठेला जातात, याची त्याला पूर्ण माहिती होती. कर्जात बुडाल्यामुळे त्याने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कृष्णा निरडे आणि अभिषेक शिंदे यांच्याशी हातमिळवणी केली आणि हा दरोडा टाकला.

​ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, सुशांत सुतळे, महेश विघ्ने, जफर पठाण, महेश जोगदंड, मारुती कांबळे, भागवत शेलार, राहुल शिंदे आणि TAC सेलच्या पथकाने केली आहे.

​पुढील तपास माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि गोविंद पांडव करत आहेत.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles