पोलिसांच्या शास्त्रोक्त तपासामुळे आरोपीला मिळाली शिक्षा; न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
बीड |
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला बीडच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने १० वर्षे सक्त मजुरी आणि ९००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सर्फराज पि.अ. रशीद सय्यद असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. पेठ बीड पोलिसांनी केलेल्या शास्त्रोक्त तपासामुळे आणि भक्कम पुराव्यांमुळे पीडितेस न्याय मिळाला आहे.
दिनांक २६ मे २०२१ रोजी पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. अज्ञात इसमाने तिला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिली होती. या तक्रारीवरून सुरुवातीला कलम ३६३ (भादंवि) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जी. एच. पठाण यांनी तातडीने चक्र फिरवून २९ मे २०२१ रोजी आरोपी सर्फराज याला अटक केली.
तपासादरम्यान पीडित मुलगी आणि आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासी अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शास्त्रोक्त पद्धतीने पुरावे गोळा केले. वैद्यकीय अहवालात पीडितेवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, गुन्ह्यात कलम ३६६ (अ), ३७६, ३७६ (२) (जे) आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या कलमांची वाढ करण्यात आली. सर्व तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले गेले.
या खटल्याची सुनावणी मा. अतिरिक्त सत्र न्यायाधीश-१ श्री. व्हि. एच. पाटवदकर यांच्यासमोर झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील श्री. सुहास सुलाखे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. साक्षीदार आणि पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर, न्यायालयाने २० जानेवारी २०२६ रोजी आरोपीला दोषी धरले. आरोपीला विविध कलमांखाली १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.
पोलिस दलाचे यश:
या गुन्ह्याचा तपास यशस्वी करण्यात पोलीस उपनिरीक्षक जी. एच. पठाण यांना पोलीस हवालदार सिराज पठाण व सुभाष मोठे यांनी मोलाची मदत केली. तसेच साक्षीदारांना वेळेत न्यायालयात हजर ठेवण्याचे काम पैरवी अधिकारी बाळासाहेब सानप यांनी चोख बजावले.
तपास अधिकारी, सरकारी वकील आणि न्यायालय यांच्यातील उत्तम समन्वयामुळे पीडितेला न्याय मिळाला असून, “गुन्हा करणाऱ्याला शिक्षा अटळ आहे” हा संदेश या निकालातून समाजात गेला आहे. बीड पोलिसांच्या या कार्यक्षम कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


