1.1 C
New York
Friday, January 23, 2026

Buy now

spot_img

एसटी प्रवासात दिव्यांग प्रमाणपत्रांची कडक तपासणी; बनावट कार्ड आढळल्यास थेट गुन्हा दाखल होणार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

 

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास सवलतीचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या प्रमाणपत्रांची आता अधिक प्रभावीपणे पडताळणी केली जाणार आहे. बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे सवलत घेणाऱ्यांना चाप लावण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने सर्व वाहक आणि तपासणी पथकांना ‘UDID’ मोबाईल ॲपद्वारे पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. जर कोणाचे ओळखपत्र बनावट आढळले, तर त्यांच्यावर ‘दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६’ नुसार गुन्हा दाखल करून ओळखपत्र जप्त केले जाणार आहे.

 

दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. अनेक ठिकाणी अपात्र व्यक्ती बनावट प्रमाणपत्रांचा वापर करून सवलतीचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही गळती रोखण्यासाठी आणि केवळ पात्र दिव्यांग व्यक्तींनाच लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.

कशी होणार पडताळणी?

मोबाईल ॲपचा वापर: एसटीचे वाहक, पर्यवेक्षक आणि मार्ग तपासणी पथक आपल्या मोबाईलमध्ये ‘UDID Dept. of Empowerment of PWD’ हे अधिकृत ॲप्लिकेशन डाऊनलोड करतील.

त्वरीत तपासणी: प्रवासादरम्यान दिव्यांग व्यक्तीच्या वैश्विक ओळखपत्राचा (UDID) क्रमांक आणि जन्मदिनांक ॲपमध्ये टाकून त्याच्या वैधतेची खात्री केली जाईल.

ओळखपत्र वैध असल्यास: पडताळणीनंतर कार्ड अधिकृत आढळल्यास प्रवाशाला नियमानुसार सवलत दिली जाईल.

बनावट कार्ड आढळल्यास कठोर कारवाई

तपासणीदरम्यान एखाद्या प्रवाशाचे UDID कार्ड बनावट, अवैध किंवा चुकीचे आढळल्यास ते तात्काळ जप्त केले जाईल. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या कलम ९१ नुसार संबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना सर्व आगार व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत. तसेच, जप्त केलेल्या ओळखपत्रांचा अहवाल दरमहा विभागीय कार्यालयाला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

प्रवाशांना आवाहन:

“ही तपासणी प्रक्रिया राबवताना प्रवाशांना कोणताही मनस्ताप होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पात्र दिव्यांग बांधवांनी सहकार्य करावे आणि प्रवासावेळी आपले मूळ UDID कार्ड सोबत ठेवावे,” असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles