पाटोदा |
पाटोदा नगर पंचायत कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. कार्यालयात कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना आपल्या कामासाठी तासनतास ताटकळत राहावे लागत आहे. विशेष म्हणजे, अनेक कर्मचारी गेल्या १० वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून असल्याने त्यांची मुजोरी वाढली असून, नगर पंचायत पदाधिकाऱ्यांनाही कर्मचारी जुमानित नसल्याचे दिसून येत आहे.याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
नगर पंचायतीमध्ये जन्म-मृत्यू दाखले, मालमत्ता कर, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेशी संबंधित कामांसाठी पाटोदा शहरातील नागरिक दररोज येतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कार्यालयात फेरफटका मारला असता अनेक खुर्च्या रिकाम्या पाहायला मिळत आहेत. अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत आणि कार्यालयात येण्याची कोणतीही निश्चित वेळ पाळत नाहीत, असा आरोप नागरिक करत आहेत.
प्रभारी पदभार अन् प्रशासकीय मरगळ
पाटोदा नगर पंचायतीला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने सध्याचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे. प्रभारी मुख्याधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी मर्यादित वेळ देत असल्याचा फायदा स्थानिक कर्मचारी घेत आहेत. कार्यालयात कोणीही वेळेवर येत नाही आणि आले तरी जनतेची कामे वेळेवर केली जात नाहीत. प्रमुखांचा वचक नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासकीय शिस्तीचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे.
एकाच जागेवर १० वर्षे; कर्मचाऱ्यांची ‘दांडगाई’ वाढली
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर पंचायतीमधील काही कर्मचारी गेल्या १० वर्षांहून अधिक काळ एकाच पदावर आणि एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. दीर्घकाळ एकाच जागी असल्याने या कर्मचाऱ्यांचे स्थानिक पातळीवर लागेबांधे निर्माण झाले आहेत. यामुळे नियमानुसार काम करण्याऐवजी स्वतःच्या मर्जीने कारभार करण्याकडे त्यांचा कल वाढला आहे. कामासाठी येणाऱ्या नागरिकांना उद्धटपणे उत्तरे देणे किंवा जाणीवपूर्वक कामे प्रलंबित ठेवणे, असे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे तीन वर्षे पेक्षा अधिक कालावधी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी
नगर पंचायतीच्या या भोंगळ कारभारामुळे पाटोदा शहराच्या विकास कामांवरही परिणाम होत आहे. जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन, दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.
“आम्ही छोट्या कामासाठी लांबून येतो, पण साहेब जागेवर नसतात. कर्मचारी कधी येतील याचा नेम नसतो. आम्हाला दिवसभर ताटकळत बसावे लागते. प्रशासनाने बायोमेट्रिक हजेरी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांकडे लक्ष दिले पाहिजे.”
— एक त्रस्त नागरिक, पाटोदा


