बीड |
गेवराई तालुक्यातील रामपुरी येथे सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला बीड सत्र न्यायालयाने सोमवारी (१२ जानेवारी २०२६) २० वर्षे कारावास आणि १० हजार रुपये दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पीडित बालिकेला चार वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला असून, बीड पोलिसांच्या चोख तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
४ मे २०२२ रोजी रामपुरी (ता. गेवराई) येथे ही धक्कादायक घटना घडली होती. सुंदर निवृत्ती तायडे (वय ३४) याने सहा वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केला होता. याप्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ४५२, ३७६ आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासाला मिळाले यश
या गुन्ह्याचा तपास पिंक पथकाच्या महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना भोसले यांनी केला. त्यांनी अत्यंत कौशल्याने पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. तपास पथकात सहाय्यक पोलीस फौजदार भगवान खाडे, महेश झिकरे आणि ज्योती साळुंखे यांचा समावेश होता. पोलिसांनी सादर केलेले साक्षीदार आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीवरील गुन्हा सिद्ध झाला.
न्यायालयाचा निकाल
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, माननीय सत्र न्यायालय बीड यांनी आरोपी सुंदर तायडे याला दोषी ठरवत २० वर्षे कारावास आणि १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात सपोनि मनोज निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस हवालदार गव्हाणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
“बीड पोलिसांच्या या कामगिरीमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये समाधानाचे वातावरण असून, पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.”
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली.


