बीड |
माजलगाव शहरासह तालुक्यात दहशत निर्माण करणाऱ्या आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या तीन गुंडांच्या टोळीवर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी मोठी कारवाई केली आहे. या तिघांनाही बीड, परभणी आणि जालना या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार (तडीपार) करण्यात आले आहे.
हद्दपार करण्यात आलेल्या गुंडांची नावे अशोक वसंत मंदे (वय २१ वर्षे), कृष्णा तुकाराम निरडे (वय २२ वर्षे), अभिषेक अशोक शिंदे (वय २२ वर्षे) सर्व राहणार: कचारवाडा, पावर हाऊस जवळ, ता. माजलगाव)
दहशत माजविणाऱ्या टोळीवर ‘कलम ५५’ अंतर्गत कारवाई
माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल सुर्यतळ यांनी या टोळीविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. या टोळीवर खुनाचा प्रयत्न, दंगा करणे, सरकारी नोकरावर हल्ला, बेकायदेशीर जमाव जमवणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि सामान्य जनतेला मारहाण करून दहशत निर्माण करणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारी कृत्यांमुळे जनतेत भीतीचे वातावरण होते.
या प्रस्तावाची उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी चौकशी केल्यानंतर, पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी संबंधितांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली. मात्र, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि लोकांवरील दहशत पाहता, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आज, ९ जानेवारी २०२६ रोजी या तिघांनाही दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश पारित केले.
पोलीस अधीक्षकांचा इशारा
बीड जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यापासून पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कंबर कसली आहे. केवळ हद्दपारीच नव्हे, तर आगामी काळात टोळीने गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध MPDA आणि मकोका (MCOCA) सारख्या कठोर कारवाया करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, एसडीपीओ शैलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली माजलगाव शहरचे पोनि राहुल सुर्यतळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि शिवाजी बंटेवाड, सपोउपनि अभिमन्यु औताडे, महादेव बहीरवाळ, बागवान आणि बिबिसेन चव्हाण यांनी केली आहे.


