स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 31 जानेवारीपर्यंत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे मोठे आव्हान राज्य निवडणूक आयोगासमोर आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून या निवडणुका कधी जाहीर करण्यात येतात, याबाबतची उत्सुकता सर्वांनाच आहे. अशातच आज मंगळवारी (ता. 4 नोव्हेंबर) राज्य निवडणूक आयोगाकडून महत्त्वाची पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. ही पत्रकार परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात असणार आहे, याबाबतचे परिपत्रक सुद्धा जारी करण्यात आले असून राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे दुपारी 4 वाजता सचिवालयात ही पत्रकार परिषद घेणार आहेत.

राज्य निवडणूक आयोग आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची चिन्हं आहेत. याशिवाय आज किंवा उद्यापासूनच राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यात 246 नगरपालिका, 42 नगरपंचायती, 32 जिल्हा परिषद, 336 पंचायत समिती आणि 29 महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे आज जर का राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांची घोषणा केली तर लागलीच आज किंवा उद्यापासून राज्यात आचारसंहिता लागू शकते, असेही सांगण्यात येत आहे. महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तीन टप्प्यांत पार पाडण्याचे नियोजन करण्यात आल्याचेही सूत्रांचे सांगणे आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घेणे अनिवार्य आहे. याच कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्य निवडणूक आयोगाकडून काम सुरू करण्यात आले होते. ज्या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची समजली जात आहे. त्यामुळे आज राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजवणार का? हे स्पष्ट होईल. तसेच, यामुळे राज्यात निवडणुकीचे जोरदार वारे सुद्धा वाहतील. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेतून राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे नेमकी काय घोषणा करतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.


                                    