11.6 C
New York
Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

मृत महिला डॉक्टरची डायरी मिळाल्याने अनेकांचे धाबे दणाणले

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

सातारा |

 

फलटण येथील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर अनेक प्रश्न अनुत्तरीत असताना त्या नियमित दैनंदिनी लिहीत असल्याचे समोर आले आहे. रोजची वैयक्तिक माहिती त्या लिहीत होत्या. प्रामुख्याने शवविच्छेदन अहवालाच्या नोंदी, दबावाबद्दलचा तपशीलही त्यांनी डायरीत नमूद केल्याचे तपासात पुढे आले आहे. ही डायरी मिळाल्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ही डायरी पोलिसांच्या हाती लागल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

 

फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे हे प्रकरण सध्या राजकीय मुद्दा बनले आहे. या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेत पोलिसांकडून सर्व बाजुंनी तपास सुरू आहे. या तपासामध्येच संबंधित डॉक्टरांची डायरी पोलिसांच्या हाती लागली आहे.

 

दोशी म्हणाले की, या महिला डॉक्टरांना रोज डायरी लिहिण्याची सवय असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये त्या त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या रोजच्या घटनांची नोंद करून ठेवत होत्या. यामध्ये व्यक्तीगत गोष्टींपासून ते शवविच्छेदन अहवालाच्या नोंदीदेखील त्यांनी नोंद करून ठेवलेल्या आहेत. या डायरीमुळे अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्यास मदत होईल. याशिवाय मागील काही महिन्यांपासून त्यांच्यावर पोलीस, डॉक्टर व राजकारण्यांकडून कसा दबाव येत होता, याबाबतची नोंद देखील या डायरीमध्ये असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

 

 

संबंधित महिला डॉक्टर फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी होत्या. त्यांनी फलटणशिवाय सातारा जिल्ह्यात इतर ठिकाणीही कमी कालावधीसाठी वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. यांच्यासोबत ज्यांनी ज्यांनी काम केले त्यांच्याकडून या महिला डॉक्टरांबाबत माहिती गोळा केली जात असल्याचेही दोशी यांनी सांगितले.

 

दरम्यान, निलंबित उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांचे मृत महिला डॉक्टरांसोबतचे दूरध्वनी संवाद, संदेश पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याचाही तपास केला जात आहे. याप्रकरणी दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून, सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. संशयित आरोपींविरोधात काय काय पुरावे मिळतील, याचा तपास पोलीस करत आहेत. इतर तांत्रिक तपासही सुरू आहे. मृतदेह ज्या दिवशी सापडला, त्याच्या अगोदरपासूनचे हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले आहे. यामध्ये स्वतः महिला हॉटेलमध्ये आल्याचे दिसत आहे. याशिवाय संपूर्ण काळात इतर कोणतीही संशयास्पद हालचाल झालेली दिसत नाही. दरम्यान, डॉक्टर महिला लॉजवर का गेली, हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. या प्रकरणात तपास व्यवस्थित सुरू आहे. पोलिसांवर कोणताही दबाव नाही. तपास व्यवस्थित व्हावा, यासाठी गृहमंत्री यांचे आदेश आहेत. तपास योग्य पद्धतीने सुरू असल्याचेही तुषार दोशी यांनी सांगितले.

 

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles