परळी |
तालुक्यातील नंदागौळ येथे सोमवारी सकाळी बालविवाह होणार असल्याची माहिती चाईल्डलाईला मिळाली. परंतू पथक पोहचण्याआधीच शुभमंगल सावधान झाले होते. त्यानंतर ग्रामसेवकांसह पोलिसांनी सर्व पंचनामा करून नवरदेव, दोन्हीकडील नातेवाईक, फोटोग्राफर, मंडपवाला, भटजीसह जवळपास 200 नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे लग्नानंतर सर्वांनीच गावातून पळ काढल्याचे समोर आले आहे.
परळी तालुक्यातील नंदागौळ येथील आदिनाथ गोविंद गित्ते (वय 24) याचा विवाह चोपनवाडी (ता. अंबाजोगाई) येथील 16 वर्षीय मुलीसोबत रविवारी सकाळी 11 वाजता नियोजित होता. ही माहिती चाईल्ड लाइनला 1098 या क्रमांकावरून मिळाली. चाईल्ड लाईनचे संतोष रेपे यांनी ग्रामसेवकास ज्ञानेश्वर मुकाडे याची माहिती दिली. या सर्वांनी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास भेट दिली असता सर्व साहित्य आढळले. त्यानंतर पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. लग्न लावून वधू वरासह सर्व नातेवाईक व वर्हाडी पसार झाल्याने पोलिसांच्या हाती कोणीच लागले नाही.
अखेर ग्रामसेवकक मुकाडे यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात नवरदेव व नवरीचे आई-वडील, दोघांचेही मामा, मंडपवाला, फोटोग्राफर, स्वयपांक करणारा अचारी यांच्यासह जवळपास 200 वर्हाडींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश झांबरे हे करीत आहेत.