बीड |
मराठा समाजाला आरक्षण भेटल्याशिवाय मुंबई सोडायची नाही, सोबतच आंदोलनादरम्यान, एकाही बांधवाने जाळपोळ, दगडफेकीसारखे पाऊल उचलायचे नाही, असा संदेश देऊन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी महायुतीच्या सरकारवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही वापरत जोरदार टीका केली.
मांजरसुंबा येथे रविवारी इशारा सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना मनोज जरांगे यांनी सरकारसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे हे २७ तारखेला मुंबईसाठी रवाना होणार आहेत. २९ तारखेला मुंबईतील आझाद मैदानावर त्यांचे आंदोलन असेल. याच आंदोलनाची अंतिम दिशा ठरवण्यासाठी मांजरसुंबा येथे भव्य बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी बीडच्या आजच्या बैठकीमुळे सरकारची पळापळ सुरू झाली असून आता आरक्षण भेटल्याशिवाय मुंबई सोडायची नाही, ही खूणगाठ बांधण्याचे आवाहन केले.
राज्य सरकारने षडयंत्र रचत आंदोलनात काही लोक घुसवले आहेत. त्यांनी काही गोंधळ केल्यास त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. फडणवीस तुमच्या एका चुकीमुळे नरेंद्र मोदींना पण डाग लागू शकतो हे लक्षात ठेवा, अशा शब्दांमध्ये जरांगे यांनी इशारा दिला. बीडच्या उपाधीक्षकांनी डीजे लावू दिला नाही आणि हे सगळं फडणवीस यांच्या सांगण्यावरून होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. काल-परवा फडणवीस यांनी मागणी नसतानाही २९ जाती ओबीसीमध्ये सामील केल्या. मात्र मराठा समाज मागणी करत असतानाही त्याला ओबीसीमध्ये घेतले जात नाही. आपल्या ५८ लाख कुणबी नोंदी असूनही आपल्याला आरक्षण दिले जात नाही. याचबरोबर सरकारने ‘लाडक्या बहिणीं’नाही फसवल्याचा आरोप जरांगे यांनी केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आधी महादेव मुंडेंचे आरोपी पकडून दाखवावेत. आपण कधीही जातिवाद केलेला नाही. परळीत दोन घरात मंत्री असतानाही महादेव मुंडे यांचा प्रश्न सुटला नाही. त्यासाठी आपण पुढे आलो आहोत. आमच्या लेकींप्रमाणे आम्ही बाकीच्या लेकींनाही जपतो, असे संस्कार आमच्यावर आहेत, असे जरांगे पाटील म्हणाले.