प्रेमसंबंधाच्या कारणावरून गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे 21 वर्षीय तरुणावर पाच जणांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.या प्रकरणाने बीड जिल्हा हादरुन गेला असून पुन्हा एकदा ‘सैराट’ची आठवण ताजी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवम काशीनाथ चिकणे (रा. गंगावाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो माजलगावमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. गावातीलच एका मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. प्रेयसीने घरी कोणीच नसल्याचे सांगत शिवमला बोलावले. त्यावेळी अचानक तिचे नातेवाईक शिवम गणेश यादव व सत्यम मांगले आले. त्यांच्यात किरकोळ वाद झाल्यानंतर गावकऱ्यांनी मध्यस्थी करून विषय मिटवला.
त्यानंतर गंगावाडी ते तलवाडा रस्त्यावर शिवम दुचाकीवरून जात असताना त्याला अडवून मारहाण करण्यात आली. शिवम गणेश यादव, सत्यम मांगले, राजाभाऊ यादव, गणेश यादव व ईश्वर यादव या पाच जणांनी लाठ्याकाठ्यांनी आणि हाता-पायांनी जबर मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत शिवमला छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी आधी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. आता त्यात खुनाचे कलम वाढवण्यात येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक स्वप्निल कोळी यांनी दिली. पोलिसांनी मुलीच्या वडिलाला अटक केली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.