बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील फरार असलेले आरोपी सापडल्याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळे पकडल्याची सूत्रांकडून माहिती आहे.
काही वेळात नेमकं कोणत्या आरोपींना पकडले आहे, हे होणार स्पष्ट होणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवीन आरोपी वाढण्याची शक्यता आहे. सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळे याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांनाही पुण्यातून ताब्यात घेतल्याची माहिती आहे, त्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतरच आरोपींचा ठावठिकाणा सापडला, अशी माहिती समोर आली आहे. अद्याप पोलिसांनी याबाबतची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी दोन आरोपींना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. यात सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना 9 डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात सुदर्शन चंद्रभान घुले, कृष्णा शामराव आंधळे, सुधीर ज्ञानोबा सांगळे, महेश सखाराम केदार, जयराम माणिक चाटे, प्रतिक भीमराव घुले, विष्णू महादेव चाटे या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काहीजण फरार झाले होते, त्यातील दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.पोलिसांनी महेश केदार, जयराम चाटे, प्रतिक घुले, विष्णू चाटे या चौघांना अटक केली असून ते पोलिस कोठडीत आहेत. मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे तिघे फरार होते. त्यांना पकडून देण्यात मदत करणाऱ्यास पोलिसांनी बक्षीस देण्याची घोषणा देखील केली होती.