२ कोटी रुपये खंडणी वसूलीप्रकरणी वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे. तसेच बीड सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मास्टरमाईंड असल्याचा आरोप करण्यात येत आहे. कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने मुंडेंनीही मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली.
धनंजय मुंडे म्हणाले की, “मी का राजीनामा द्यावा याचे काहीतरी कारण लागेल. या प्रकरणात मी आरोपी नाही आणि या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही. या प्रकरणाचा बाऊ करून काहीजण माझा राजीनामा मागत आहेत. विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत. पण छोटा आका, मोठा आका, एन्काऊंटर अशा पद्धतीची भाषा मी पहिल्यांदाच ऐकतो आहे.”
“पोलिस प्रशासन, सीआयडी अतिशय व्यवस्थितपणे तपास करत आहे. दिवंगत संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन फासावर चढवणे, हा आमचा सर्वात पहिला प्रयत्न आहे. त्यामुळे कुणी काय बोलावे आणि कुणाचे काय होणार, याला काही अर्थ नाही. हे प्रकरण फास्टट्रॅकवर चालायला हवे ही मागणी मी पहिल्यांदा केली. त्यामुळे राहिलेल्या आरोपींना अटक करून चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टात त्यांना शिक्षा मिळावी,” असे ते म्हणाले.
माझ्या पदाचा कुठलाही प्रभाव होणार नाही!
मंत्रीपदाच्या राजीनाम्यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, “हा तपास सीआयडीकडे दिला असून तो न्यायालयीनसुद्धा होणार आहे. त्यामुळे मी मंत्री राहून या तपासावर कुठलाही प्रभाव होऊ शकत नाही. या प्रकरणात सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन या तिन्ही प्रकारे चौकशी सुरु आहे. त्यामुळे मीच पालकमंत्री किंवा मीच मंत्री का नसावे, हे विरोध करणाऱ्यांना विचारायला हवे,” असे ते म्हणाले.