मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात व पवन ऊर्जा कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी फरार असलेला वाल्मीक कराडने आज पुण्यात सीआयडी अधिकाऱ्यांपुढे आत्मसमर्पण केलं आहे.
देशमुख हत्या प्रकरणात जे आरोपी असतील त्यांना अटक करण्यात यावी असे आत्मसमर्पण करतांना वाल्मीक कराड याने सीआयडीच्या अधिकाऱ्यांना म्हटलं आहे.
काय म्हणाला वाल्मीक कराड ?
मी वाल्मीक कराड, माझ्यावर केज पोलिस ठाण्यात खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला अटकपूर्व जामीन मिळवण्याचा अधिकार असतांना देखील पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये आत्मसमर्पण केलं आहे. संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव या घटनेशी जोडले जात आहे. जर पोलिस तपासात यात मी दोषी आढळलो तर मी शिक्षा भोगायला तयार आहे, असे कराड याने म्हटले आहे.
बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात अलि होती. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. देशमुख यांचे अपहरण आणि हत्येबद्दल तर पवनचक्की फर्मच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्या प्रकरणी देखील गुन्हा दाखल आहे. तर मस्साजोग येथे पवनचक्की प्रकल्प उभारणाऱ्या अक्षय ऊर्जा कंपनीवर स्थानिक गावकऱ्यांनी २ कोटी रुपयांच्या खंडणी घेतल्या प्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारणी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. देशमुख यांच्या हत्येमागे त्यांचा प्रमुख हात असल्याचा आरोप होत होता. वाल्मीक कराड गेल्या काही दिवसांनपासून फरार होता. सीआयडीच्या पथकाने रविवारी त्याची संपत्ती गोठवली. यानंतर वाल्मीकला अटक कधी होणार हा प्रश्न विरोधक उपस्थित करत होते.
वाल्मिक कराडला २९ डिसेंबरला अटक करण्यात आल्याची माहिती होती. मात्र, सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळून लवले. मात्र, आज १२ च्या सुमारास वाल्मीक कराड पुण्याच्या सीआयडी ऑफिसमध्ये येत शरण आला. त्याला अटक करण्यात आली आहे.