बीड |
एका ऊसतोड कामगाराच्या मुलीचा ऊसाने भरलेल्या बैलगाडीच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना सातारा जिल्ह्यातील कराड येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात घडली आहे.
देवयानी भाऊसाहेब गायकवाड वय ९ वर्ष असं मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. या दुर्देवी घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत असून गायकवाड कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिवरसिंग येथील भाऊसाहेब गायकवाड हे गेली दहा वर्षांपासून आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी ऊसतोडीचे काम करीत आहेत. ते कृष्णा सहकार साखर कारखान्यावर तीन महिन्यांपासून बैलगाडीवरून ऊसतोडणीचे काम करतात.
भाऊसाहेब ऊसतोडणीसाठी बाहेरगावी असताना, त्यांची मुलगी देवयानी ही हिवरसिंगा येथील जिल्हा परिषद शाळेत चौथीच्या वर्गात शिकत होती. मात्र आजीचे निधन झाल्याने वडील देवयानीला सोबत घेऊन गेले होते.
मयत देवयानी ही आपल्या वडिलांसोबत बैलगाडीवर बसलेली होती. यादरम्यान अचानक तोल जाऊन ती खाली पडली आणि याचवेळी ती बैलगाडीच्या टायरखाली आल्याने तिचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.