विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज अखेर मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी महायुतीचे उमेदवार पुतण्या डॉ. योगेश क्षीरसागर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा दिवस जसा जवळ येत आहे. तसतशी निवडणुकीतील चुरस अधिक वाढत आहे. अर्थात माघार झाल्यानंतर काही ठिकाणी लढतीचे चित्र स्पष्ट झाले असताना आजही अचानक मित्र पक्ष किंवा जवळचे कार्यकर्ते, पदाधिकारी सोडून जात असल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्यानुसार बीडमध्ये देखील पाहण्यास मिळाले असून मतदानाला काही दिवस बाकी असतानाच काकाने पुतण्याला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
बीड विधानसभा निवडणुकीच्या मैदानात क्षीरसागर कुटुंबातील काका आणि दोन पुतण्याने उडी घेतली होती. मात्र काही कारणामुळे काका जयदत्त क्षीरसागर यांनी माघार घेतली आणि आता महायुतीकडून योगेश क्षीरसागर तर महाविकास आघाडीकडून संदीप क्षीरसागर हे क्षीरसागर कुटुंबातील २ बंधू बीड विधानसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत. यामध्ये आता क्षीरसागर यांनी योगेश क्षीरसागर यांना जाहीर पाठिंबा दिल्याने संदीप क्षीरसागर यांना मोठा धक्का बसला आहे. तर पाठिंब्याने योगेश क्षीरसागर यांचे पारडे अधिक जड झाले आहे. यामुळे आता या 2024 च्या निवडणुकीमध्ये गुलाल कोण उधळणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.