महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घ्यायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. 4 नोव्हेंबर म्हणजेच उद्यापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत, पण त्याआधीच अपक्ष उमेदवार त्याची पत्नी, बहीण आणे मेहुण्याचं अपहरण करण्यात आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांचं अपहरण करण्यात आलं आहे. शिर्डीहून नाशिककडे जाताना अपहरण झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात राजू शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचं अपहरण झाल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. झिरो नंबरने हा गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. उमेदवार राजू शिंदे यांचे सहकारी मंगेश जाधव यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे गट आणि अपक्ष उमेदवार यांच्या नावात साधर्म्य आहे. संगमनेर शहराजवळील समनापूर गावाजवळ घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
शिवसेनेचे उमेदवारही नॉट रिचेबल
दरम्यान दिंडोरी मतदारसंघातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एबी फॉर्म मिळालेले धनराज महाले आणि देवळाली विधानसभा मतदारसंघातून एबी फॉर्म मिळालेल्या राजश्री अहिरराव नॉट रिचेबल झाल्या आहेत. या दोन्ही उमेदवारांना महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश देण्यात आल्यानंतरही ते नॉट रिचेबल झाले आहेत, यामुळे शिवसेनेसह महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान या दोन्ही उमेदवारांना फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवण्यात आला होता.