विधानसभेच्या मतदानावेळी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारातील मतपत्रिका ही उमेदवाराला नमुना मतपत्रिका म्हणून छापता येणार नाही. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यावर निर्बंध राहणार असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.
राजकीय पक्ष, निवडणूक लढवणारे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी किंवा त्यांच्या हितचिंतकांकडून प्रामुख्याने प्रचारासाठी लागणारे पॅम्प्लेट, पोस्टर, फ्लेक्स याचा प्रभावी वापर होत आहे. परंतु, या प्रचार साहित्यावर प्रकाशक, मुद्रक आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता आणि प्रतींची संख्या नसेल तर आरपी अॅक्ट १२७ (अ) नुसार गुन्हा दाखल केला जाणार आहे. याशिवाय, निवडणुकीतील मतपत्रिकेसारखा कागद प्रचारासाठी नमुना मतपत्रिका म्हणून वापरण्यास निर्बंध आहेत. मात्र, यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कागदावर नमुना मतपत्रिकेचा वापर उमेदवारांना करता येईल. तसेच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण इत्यादीवर तसेच तालुक्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व उमेदवार, प्रतिनिधी यांच्या वाहनाच्या ताफ्यात दहापेक्षा अधिक मोटारगाड्या अथवा वाहने वापरण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध राहणार आहे. रहदारीच्या अडथळ्यावर अ उपाययोजना राजकीय पक्षांनी, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकांनी सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, निवडणुकीसंबंधी पोस्टर्स बॅनर्स, पॅम्प्लेटस्, कटआऊटस्, होर्डिंग्ज, कमानी लावणे या व इतर बाबींमुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊ शकेल किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.यासाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे… पोलिस अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. सकाळी ६ वाजण्यापूर्वी व रात्री १० नंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनिक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, सर्व राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या वापरासंबंधी घेतलेल्या परवा- नगीची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यंत्रणेला कळवावी लागेल.