विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शक्तिप्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी मानखुर्द-शिवाजीनगर या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यावरून महायुतीमधील भारतीय जनता पार्टीने कडाडून विरोध केला आहे. मात्र असं असताना नवाब मलिक हे निवडणूक लढवण्यावर ठाम होते. त्यांनी अर्ज भरण्यासाठी अखेरचे काही तास असताना अर्ज दाखल केला. नवाब मलिक हे अपक्ष लढणार की अजित पवारांचा पक्ष त्यांना अधिकृत उमेदवारी म्हणून एबी फॉर्म देणार याबद्दल अगदी शेवटच्या क्षणापर्यंत गूढ कायम असतानाच अजित पवारांच्या पक्षाने एबी फॉर्म दिल्याने नवाब मलिक हे पक्षाचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. मात्र या निर्णयानंतर आता भाजपाने कठोर भूमिका घेत अजित पवारांच्या पक्षाला आगामी प्रचारासंदर्भात भाष्य करताना थेट सहकार्य करणार नाही असं सांगितलं आहे.
भाजपा करणार नाही प्रचार
‘भाजप नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही’, असा पुनरुच्चार मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मंगळवारी दिनांक 29 ऑक्टोबर रोजी केला. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार शेलार म्हणाले, “भाजपची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट राहिली आहे. महायुतीमधील सर्व पक्षांनी आपापले उमेदवार आपणच ठरवायचे आहेत. विषय फक्त राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांना दिलेल्या उमेदवारीबद्दल आहे. यासंदर्भात भाजपची भूमिका याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मीही वारंवार स्पष्ट केली आहे. आता पुन्हा एकदा सांगतोय, भाजप नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही. आमची भूमिका दाऊद आणि दाऊदशी संबंधित केससंदर्भातील व्यक्तीच्या प्रचाराची नाही”, असे आशिष शेलार म्हणाले.
सना मलिक यांचा प्रचार करणार
नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना अणुशक्तीनगर मतदारसंघातून अजित पवारांच्या पक्षाने उमेदवारी दिली आहे. साना मलिक यांच्या प्रचारासंदर्भात विचारलं असता आशिष शेलार , “यासंदर्भातील कोणताही पुरावा किंवा माहिती समोर येत नाही, तोपर्यंत महायुतीचा उमेदवार हाच भाजपचा उमेदवार आहे, याबाबत दुसरा प्रश्न उपस्थितच होत नाही,” असं म्हणाले.
शेवटची पाच मिनिटं असताना मिळाला अर्ज
“आज मी नामांकन अर्ज दाखल केला. अपक्ष आणि पक्षाचा अर्ज होता. 2 वाजून 55 मिनिटांनी पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म आला. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी विश्वास दाखवला. या भागात दहशत आहे. घाणीच साम्राज्य आणि ड्रग्जचा विळखा आहे. आरोग्याच्या समस्या आणि बाल मृत्यू दर अधिक आहे. विकास करण्यासाठी वाव आहे. इतर कोणीही इथे लढू शकत नव्हता. लोकांच्या विश्वासावर मी जिंकून येणार,” असा विश्वास व्यक्त केला.