विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा काही वेळ शिल्लक राहिला असला तरी महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागावाटप काही अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचू शकलेलं नाही. त्यात महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या नेत्यांनी अनेक मतदारसंघांत मित्रपक्षांच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी केली आहे.त्यामुळे या बंडखोरांना आवरण्याचं आव्हान सर्वच पक्षांसमोर उभं राहिलं आहे. काही ठिकाणी बंडखोरी आवरण्याऐवजी मैत्रिपूर्ण लढतींचेही संकेत मिळत आहेत. दरम्यान, महायुतीमध्ये काही मतदारसंघात मैत्रिपूर्ण लढती अपरिहार्य असल्याचं सूचक विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाल्यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, महायुतीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने जागावाटप झालं आहे. मात्र आज दुपारी तीन वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल. मात्र राज्यात महायुतीमध्ये काही ठिकाणी मैत्रिपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे. ज्या मतदारसंघांमध्ये मैत्रिपूर्ण लढती होतील, त्या जागा महायुतीकडून जाहीर होतील, असेही असेही बावनकुळे यांनी सांगितले.
दरम्यान, महायुतीमधील भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटामधील अनेक नेत्यांनी अनेक विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी केली आहे. त्यामुळे काही मतदारसंघात महायुतीला धक्का बसण्याची शक्यता आहे.