नागपूर |
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांनी जागांवाटपांसाठी चाचपणी सुरू केली आहे, अशातच विद्यमान आमदार ज्या पक्षांचा आहे, त्या पक्षांना त्या-त्या जागा मिळाव्यात अशी मागणी सर्व पक्ष करताना दिसत आहे, ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार आहे, ती जागा त्याच पक्षाला देण्यात यावी, जेणेकरून त्या ठिकाणी पुन्हा तयारी करताना आणि उमेदवार निवडूण आणताना पक्षांना जास्त तयारी करता येईल. अशातच भाजप नेते आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणालेत राजकुमार बडोले?
सीटिंग-गेटिंग म्हणजेच ज्या मतदारसंघात ज्या पक्षांचा आमदार आहे, तिथे त्याच पक्षाला उमेदवारी दिली, तर महायुतीचा नुकसान होऊ शकते. त्यामुळे सर्वे करून, सामान्य मतदारांचा कौल घेऊन उमेदवारी निश्चित करण्यात यावी अशी अपेक्षा भाजप नेते आणि माजी मंत्री राजकुमार बडोले (Rajkumar Badole) यांनी व्यक्त केली आहे.
महायुतीमध्ये कोण निवडून येऊ शकतो, त्याचा सर्व्हेद्वारे अंदाज घेतला आणि उमेदवारी दिली गेली तर महायुतीचा गुंता सुटेल. मात्र, ज्या पक्षाकडे जागा आहे त्यालाच ती जागा सरसकट सोडली, तर त्याचे अनेक दुष्परिणाम ही समोर येऊ शकतात. सीटिंग गेटिंग हा सूत्र अनेक ठिकाणी लागू पडणार नाही असे ही बडोले म्हणाले आहेत. जागा वाटप होताना भाजप त्यासंदर्भात योग्य भूमिका घेईल अशी अपेक्षा बडोले यांनी व्यक्त केली आहे.
महायुतीमध्ये ही त्या संदर्भात सर्वे केले जात आहेत आणि त्या सर्वेनुसार जो पक्ष तिथे निवडणूक जिंकण्यास सक्षम आहे, त्याला ती जागा दिली जाईल असा विश्वास ही बडोले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे राजकुमार बडोले यांचा मोरगाव अर्जुनी मतदारसंघावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांचा दावा आहे. 2019 मध्ये फक्त 718 मतांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापुरे यांनी भाजप उमेदवार राजकुमार बडोले यांचा पराभव केला होता. आता विद्यमान आमदार आमचा आहे असं म्हणत राष्ट्रवादीने मोरगाव अर्जुनी मतदार संघावर दावा कायम ठेवला आहे. तर महायुतीमध्ये परंपरेनुसार मोरगाव अर्जुनीची जागा भाजपची असून भाजपही त्या ठिकाणी दावा सोडायला तयार नाही. त्यामुळे महायुतीत सीटिंग गेटिंग हा सूत्र अनेक ठिकाणी अडचणीचा ठरत आहे.