20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

अजित पवारांसोबत असलेले अनेक नेते पुन्हा शरद पवारांसोबत जाण्याच्या तयारीत; आठवडाभरात शरद पवारांना 25 नेते भेटले

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पुणे |

शरद पवारांचं पुण्यातलं निवासस्थान असलेल्या मोदी बागमध्ये मागच्या एका आठवड्यात नेत्यांची गर्दी पाहायला मिळाली, यातले बरेच जण विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. शरद पवारांच्या पक्षातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 25 नेत्यांनी एका आठवड्याभरात शरद पवारांची भेट घेतली आणि संभाव्य उमेदवारीबाबतही चर्चा केली आहे. यातल्या काही नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचं मान्य केलं तर काहींनी याबाबत गुप्तता पाळली.

सोमवारी माढा मतदारसंघाचे सहा वेळा आमदार राहिलेले बबन शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली. आपला मुलगा रणजीत शिंदे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी शिंदे इच्छुक आहेत. मी शरद पवारांची भेट घ्यायला आलो होतो, आमच्यात चांगली चर्चा झाली, अशी प्रतिक्रिया बबन शिंदे यांनी दिली आहे. याव्यतिरिक्त काहीही बोलायला बबन शिंदे यांनी नकार दिला, पण काहीच दिवसांपूर्वी माढ्यामधून माझ्या मुलाला निवडून द्या, असं बबन शिंदे म्हणाले होते.

माजी आमदार विलास लांडे आणि काँग्रेस नेते आबा बागुल यांनीही सोमवारीच शरद पवारांची भेट घेतली. अजित पवारांचे निकटवर्तीय असलेले विलास लांडे भोसरीमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. महायुतीमध्ये भोसरीची जागा भाजपकडे राहील, कारण महेश लांडगे भोसरीमधून आमदार आहेत.

आबा बागुलही पर्वती मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. पर्वती मतदारसंघ काँग्रेसला सोडावा यासाठी आबा बागुल यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. पर्वती मतदारसंघातून सध्या भाजपच्या माधुरी मिसाळ या आमदार आहेत. ‘पर्वतीमधून राष्ट्रवादीने निवडणूक लढवू नये, कारण हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून संधी मिळाली तर आमचा निश्चित विजय होईल’, असं आबा बागुल म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी 25 पेक्षा जास्त नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचं मान्य केलं आहे. निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे पर्यायाची चर्चा करण्यासाठी अनेक राजकीय नेते शरद पवारांची भेट घेण्यासाठी येत असल्याचं अंकुश काकडे म्हणाले. आम्ही काही नेत्यांना पक्षात घेतलं आहे तर अनेक जण लाईनमध्ये असल्याची प्रतिक्रिया काकडे यांनी दिली.

सध्या अजित पवारांसोबत असलेले आणि सरकारमध्ये मंत्री असलेले दिलीप वळसे पाटील यांची कन्या आणि पत्नीही शरद पवारांना भेटल्याचं बोललं गेलं, पण दिलीप वळसे पाटील यांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. दिलीप वळसे पाटील यांच्या मंचर मतदारसंघात शरद पवार ऍक्टिव्ह झाले आहेत, तसंच दिलीप वळसे पाटील यांचे विरोधक देवदत्त निकम यांना ताकद देत आहेत, त्यातच वळसे पाटलांच्या पत्नी आणि कन्येनं शरद पवारांची भेट घेतल्याच्या चर्चांमुळे खळबळ उडाली होती.

हडपसरचे सध्याचे आमदार चेतन तुपे यांनीही शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा आहे. चेतन तुपे हे सध्या अजित पवारांसोबत आहेत, तसंच त्यांना हडपसरमधून तिकीट मिळेल हेदेखील निश्चित मानलं जात आहे.

महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलामध्ये जर तिकीट मिळालं नाही तर निवडणूक लढणंही कठीण होऊन जाईल, त्यामुळेही अजित पवारांसोबत असलेले अनेक नेते पुन्हा शरद पवारांसोबत जाण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. शरद पवारांकडे सध्या कमी आमदार शिल्लक असले तरी लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाला मिळालेलं यश बघता अनेकांच्या मनात चलबिचल सुरू असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत.

याआधी सप्टेंबर महिन्यात समरजीतसिंह घाटगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, याशिवाय राजेश पाटील यांनीही शरद पवारांची भेट घेतली. ‘येत्या काही दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातले आणि पुणे जिल्ह्यातले बरेच नेते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतील’, असं पवारांच्या पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले आहेत.

सध्या पक्षात असलेल्या लोकांमध्ये कोणतीही अस्वस्थता निर्माण होऊ नये म्हणून शरद पवार भेटायला येणाऱ्या नेत्यांना उमेदवारीबाबत कोणतंही आश्वासन देत नाहीयेत. ‘नव्या उमेदवाराबाबत कोणताही निर्णय तिथले स्थानिक नेते आणि पक्षातल्या इतर नेत्यांसोबत चर्चा करूनच घेतला जाईल, हे शरद पवारांनी स्पष्ट केल्याचं’, अंकुश काकडे यांनी सांगितलं आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles