मुंबई |
लोकशाहीच्या उत्सवात सगळे सहभागी होतील, अशी इच्छा सुरूवातीलाच व्यक्त करताना ‘आमचे महाराष्ट्र आमचे मतदान’ अशी यंदाची टॅगलाईन असेल, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.
राज्यात ११ राजकीय पक्ष आहेत, त्यांच्याशी आमची चर्चा झाली. सणासुदीचे दिवस आहेत, हे लक्षात घेऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर करा, अशी सूचना सर्वपक्षीयांनी केली. तसेच सुट्टीच्या दिवसात मतदान घेऊ नका, आठवड्याच्या मधल्या वारात निवडणूक घ्या, अशी आग्रहाची विनंतीही त्यांनी केल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील ११ राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या मागण्या आणि आयोगाची भूमिका राजीव कुमार यांनी स्पष्ट केली. येत्या २६ नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे.
शहरी भागातील बुथवर मतदान जास्तीत जास्त होईल या दृष्टीने नियोजन करा, मोबाईल आत घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदान करायला जाणाऱ्या मतदारांच्या मोबाईलची सोय करावी, अशी मागणीही राजकीय पक्षांनी केल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.
वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या बदल्या करा. वृद्धांचे मतदान जास्तीत होईल, अशी सोय करा ( (ने-आण)) तसेच पैशाच्या गैरवापरावर निर्बंध आणण्याची मागणीही राजकीय पक्षांनी केल्याचे कुमार यांनी सांगितले.
महाराष्ट्राची मतदारसंख्या ९.५९ कोटी आहे. यातील महिला ४.६४ कोटी मतदारांची संख्या आहे तर पुरुष मतदारांची संख्या ४.९५ कोटी आहे. तर पहिल्यांदा मतदान करणारे १९.४८ लाख मतदार आहेत. महाराष्ट्रात १०. १ लाख १ हजार ८६ बुथ आहेत. शहरांतील बहुतांशी बुथच्या ठिकाणी सीसीटीव्ही असतील, असेही राजीव कुमार सांगितले.