मुंबई |
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसैनिकांमध्ये चांगलाच रोष दिसून येत असल्याचं विरोधक सांगत आहेत. यातच ठाकरे गटाकडून शिवगर्जना सारख्या अभियानातून बंडखोर आमदारांवर प्रखर टिका करण्यात आली आहे. यातच आता महाविकास आघाडीकडून भाजपविरोधात मोठी रणनीती आखण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आज विधानभवनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनात महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आघाडीतील प्रमुख नेते उपस्थिती होते. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता, त्याचबरोबर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून प्रत्येक जिल्ह्यांत सभा घेणार आहेत. या सभांमधून भाजप आणि शिंदेंवर निशाणा साधण्याची शक्यता आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिल्यानंतर शनिवारी (ता. ४ मार्च) ठाकरे गटाकडून पहिली जाहीर सभा खेड येथे घेण्यात आली. या सभेला उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. या सभेला झालेली गर्दी पाहता अशाच काही सभा महाविकास आघाडीने एकत्रित घ्याव्यात, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. तसेच आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता, महाविकास आघाडीकडून घेण्यात येणाऱ्या सभा या महत्वपूर्ण ठरू शकतात, असे देखील बोलले जात आहे. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात घेण्यात येणाऱ्या या सभांमधून महाविकास आघाडीचे नेते नेमके काय बोलणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
महाविकास आघाडीकडून एप्रिल- मे महिन्यात सभांचा आयोजन करण्यात आलं आहे. याची जबाबदारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर पहिली सभा ही छत्रपत संभाजीनगरला होणार आहे. त्यानंतर नागपुर, कोल्हापुर, पुणे, परभणी अशा जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा होणार आहेत.