बीड |
अवैधरित्या केलेले उत्खनन कमी दाखवण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याने दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. अंतिम तडजोडअंती एक लाख रुपयांची लाच स्विकारण्याचे मान्य केले. यातील पहिला हप्ता म्हणून एक लाख स्वीकारतान बुधवारी (ता. २१ ) रोजी बीड एसीबीने मंडळ अधिकारी सचिन सानप याला रंगेहात पकडले या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बीड तालुक्यातील मोची पिंपळगाव शिवारात १३ ऑगस्ट रोजी पिंपळनेर पोलिसांनी अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्या १२ टिप्परवर कारवाई केली होती. यावेळी ९ टिप्पर चालकांसह ताब्यात घेतले होते तर ३ टिप्पर व एक पोकलेन पसार झाले होते.
या प्रकरणात अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई महसूल प्रशासनाने सुरु केली होती. मात्र, यासाठी मुरुम उत्खनन कमी दाखवून कमी दंड करण्यासाठी मंडळ अधिकारी सचिन सानप याने मरुम उत्खनन करणाऱ्यांना २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती दीड लाख रुपयांत हा सौदा ठरला होता.
या प्रकरणी एसीबीकडे तक्रार केली होती. लाच मागणी पडताळणीनंतर बुधवारी तहसिल कार्यालयासमोरील एका हॉटेलात सापळा लावला होता. दीड लाखांपैकी पहिल्या टप्प्यात १ लाख रुपये स्विकारताना मंडळ अधिकारी सचिन सानप याला एसीबीच्या पथकाने गजाआड केले. डीवायएसपी शंकर शिंदे व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. यामुळे महसूल प्रशासनातील लाचखोरीचा मुद्दा समोर आला असून महसूल विभागात खळबळ उडाली आहे.