बीड |
माजलगाव येथे भाजप कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
आमदार प्रकाश सोळंके यांच्या ताब्यात असलेल्या सूतगिरणीत रूपांतरित केलेल्या, वस्त्रोद्योग औद्योगिक संस्थेत झालेल्या करोडोच्या गैरव्यवहाराची तक्रार भाजप कार्यकर्ते अशोक शेजुळ यांनी शासनाच्या विविध विभागाकडे दाखल केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने मंगळवारी अज्ञात सहा लोकांनी अशोक शेजुळ यांच्यावर हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांचे दोन्ही पाय आणि हात फॅक्चर झाले.
या हल्ल्या प्रकरणी आमदार प्रकाश सोळंके यांचा हात असल्याचा आरोप अशोक शेजुळ यांनी केला होता. त्यानुसार रात्री उशिरा अशोक शेजुळ यांच्या तक्रारीवरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात आमदार प्रकाश सोळंके आणि त्यांची पत्नी मंगल प्रकाश सोळंके यांच्यासह रामेश्वर तवानी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.