विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे चांगलेच आक्रमक झालेत. विधानसभेच्या मैदानात उतरण्याची भाषा करणा-या जरांगेंनी आता आणखी एक नवा निर्धार केलाय. परळीतून धनंजय मुंडे आणि जामनेरमधून गिरीश महाजनांचा पराभव करणार असल्याचं जाहीर करत आष्टी आणि येवला मतदार संघातही दिड लाखाच्यावर मराठा समाजाचे मतदान असल्याचे सांगून राज्यातल्या 113 आमदारांना पाडण्याचा मनोज जरांगे यांनी इशारा दिला आहे.
लोकसभा निवडणूकीत जरांगे फॅक्टरमुळे महायुतीला मोठा फटका बसला. त्यानंतर जरांगेंनी कुणाला पाडायचं आणि कुणाला पाठींबा द्यायचा यासंदर्भात 29 ऑगस्टला निर्णय जाहीर करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळेच जरांगेंनी त्यांच्या निशाण्यावर असलेल्या काही मतदारसंघांमधल्या मराठा मतादारांचा हिशोब मांडायला सुरूवात केलीय.
जरांगे लढणार, कुणाला नडणार?
आष्टी-पाटोदा-शिरुर मतदारसंघात 1 लाख 80 हजार मराठा मतं.
जामनेर मतदारसंघात 1 लाख 36 हजार मराठा मतं.
येवला मतदारसंघात 1 लाख 46 हजार मराठा मतं.
परळी मतदारसंघात 1 लाख 14 हजार मराठा मतं असल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलं होतं.
लोकसभेत 23 उमेदवारांना पाडल्याचा दावा करत आता या आकडेवारीच्या जोरावरच मनोज जरांगे यांनी मुंडे आणि महाजनांसह राज्यातल्या 113 आमदारांना पाडण्याचा इशारा दिलाय.
जरांगेंनी आता 113 आमदारांना पाडण्याचा इशारा दिल्यामुळे सर्वच पक्षांमधल्या आमदारांचं धाबं दणाणलंय. कारण जरांगेंच्या हिटलिस्टवरील भुजबळ, महाजन, मुंडे हे सर्वश्रृत असले तरी इतर 110 आमदार कोण याचीच आता राज्यभर चर्चा सुरू झालीय.