मराठवाड्यातील ‘वर्ग २’च्या इनामी जमिनी ‘वर्ग १’ मध्ये रुपांतरित करून भोगवटादार अथवा कब्जेदार यांच्या ताब्यात कायमस्वरूपी मालकी हक्काने देण्यास महाराष्ट्र मंदिर महासंघाने तीव्र विरोध दर्शविला आहे.
महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची यासंदर्भात बैठक झाली. मंदिरांचे आर्थिक व्यवस्थापन, दिवाबत्ती आणि वार्षिक उत्सव आदी सर्व व्यवस्थित पार पडावे, या उदात्त हेतूने राजे-महाराजे यासह भाविकांनी स्वतःची जमीन मंदिरांना दान दिली.या ‘वर्ग २’ मध्ये असलेल्या जमिनी कोणालाही विकता येत नाही, असे असताना मराठवाड्यातील या ‘वर्ग २’च्या इनामी जमिनी ‘वर्ग १’ मध्ये रुपांतरित करून भोगवटादार अथवा कब्जेदार यांच्या ताब्यात कायमस्वरुपी मालकी हक्काने देण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
एक कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या जमिनीचे केवळ ५ लाख रुपये भोगवटादार वा कब्जेदाराने जमा करायचे. त्यातील केवळ २ लाख रुपये रक्कम एकदाच मंदिराला मिळणार, हे अत्यंत अन्यायकारक असल्याचे महासंघाने म्हटले आहे.
सरकारचा हा निर्णय मंदिरांना कायमस्वरूपी आर्थिकदृष्ट्या दुर्बल करणारा असल्याने महाराष्ट्र मंदिर महासंघाचा या निर्णयाला तीव्र विरोध आहे. सरकारने या निर्णयाचा फेरविचार करून असा कोणताही निर्णय घेऊ नये.
– सुनील घनवट, राज्य समन्वयक – महाराष्ट्र मंदिर महासंघ