गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात आयएएस अधिकारी पूजा खेडकर दिवसेंदिवस त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.पूजा खेडकर यांच्यावर होत असलेल्या आरोपांची चौकशी देखील सुरु करण्यात आली आहे. तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार पूजा खेडकर यांना ट्रेनिंग होल्ड करण्याचे आदेश नितीन गद्रे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी दिले आहे.
पुण्यात चमकोगिरीमुळे चर्चेत आल्यानंतर आणि वादात अडकल्यानंतर पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली होती. पुण्यात ऑडी कारवर अंबर दिवा लावल्याचा आणि वरिष्ठांचे केबिन बळकावल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यानंतर ओबीसी सर्टिफिकिट, दिव्यांग सर्टिफिकीटच्या आधारे आरक्षणाच्या कोट्यातून युपीएससी परीक्षा दिल्यानं त्यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. अनेक आरोपांमुळे त्यांच्या चौकशीची मागणीही केली जात आहे.
डिओपीटीकडून पूजा खेडकर यांचा प्रशिक्षणार्थी कालावधी संपुष्टात आणल्याचे आदेश करण्यात आले आहेत. त्यांना मसूरीतील लाल बहाद्दुर शास्त्री राष्ट्रीय अकादमीत हजर रहावं लागणार आहे. पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षणाला सध्या स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूजा खेडकर यांना महाराष्ट्रातून प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून सेवामुक्त करण्यात आलंय.
महाराष्ट्रात त्या सध्या वाशिम जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होत्या. गेल्याच आठवड्यात त्यांची बदली करण्यात आली होती. आता त्यांना मसूरीतील अकादमीत हजर रहावं लागणार आहे. त्यासाठी २३ जुलै पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी आदेशाचे पत्र पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांना पाठवलं आहे. या पत्राची प्रत राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह संबंधित विभागांना देण्यात आली आहे.
प्रमाणपत्र देणाऱ्यांचीही होणार चौकशी
पूजा खेडकर यांच्या दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्रावरून अनेक आरोप झाले आहेत. आता या प्रकरणी प्रमाणपत्र देणाऱ्यांची चौकशी होणार असून तोपर्यंत पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण आठवडाभर थांबवण्यात आले आहे. पूजा 15 ते 19 जुलै या कालावधीत अकोल्यातील आदिवासी विकास प्रकल्पात इंटर्न म्हणून रुजू होणार होत्या. मात्र वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याला स्थगिती दिलीय.
चौकशी समिती 2 आठवड्यात करणार अहवाल सादर
पूजा खेडकर यांच्या उमेदवारीची पडताळणी करण्यासाठी केंद्राने एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे. केंद्राच्या अतिरिक्त सचिव दर्जाचे अधिकारी याची चौकशी करत आहेत. 2023 च्या बॅचच्या अधिकारी खेडकर यांच्या उमेदवारीचे दावे आणि इतर तपशीलांची पडताळणी समितीकडून केली जातेय. ही समिती चौकशीनंतर दोन आठवड्यात या प्रकरणाचा अहवाल सादर करणार आहे.